मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना (Saamana)च्या रोखठोक (Rokhthok) कॉलममधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 2021 साल सरले, पण 2022 या वर्षात आशेची किरणे दिसतील काय? असा सवाल करत राऊत यांनी पंतप्रधानांनी खरेदी केलेल्या गाडीवरुन देखील टीका केली आहे. राऊत म्हणाले की, महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
खासदार राऊत यांनी लिहिलं आहे की, 2021 अनेक जळमटे तशीच ठेवून सरले आहे. तेच निर्बंध, तेच सर्व प्रश्न 2022 च्या झोळीत टाकून 2021 सरले तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला असे चित्र दिसले नाही. 2020 मावळताना 2021 वर्षाला गोंधळ व अराजकाची भेट दिली. 2021 ने 2022 ला तोच नजराणा पुढे दिला. मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे. 28 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या 12 कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये, असं राऊतांनी म्हटलं आहे.
गांधी घराण्याच्या साहसाचं केलं कौतुक
राऊत पुढं लिहितात, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाड्या वापरतात. पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. तामीळनाडूच्या गर्दीत राजीव गांधी गेले व लिट्टेकडून मारले गेले. हे त्यांचे साहस होय. त्यांनी असे साहस करायला नकोच होते, पण केले. पंतप्रधान मोदींची 12 कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
नवे वर्ष कोणत्या आशांची किरणे दाखवणार?
राऊत यांनी म्हटलं आहे की, राजकारण्यांची विश्वासार्हता रसातळाला नेणारे वर्ष मावळले म्हणत नवे वर्ष कोणत्या आशांची किरणे दाखवणार? देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करणे आता अशक्यप्राय बनले आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून मोदी व सरकार 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहेत. मोदी यांचे वृत्तवाहिन्यांवरील रोजचे 'दर्शन' पाहिले तर तेच स्वतः भ्रमंतीसाठी वेळ आणि पेट्रोल किती खर्च करीत आहेत ते लक्षात येते. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती, बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झाले ते पुरे झाले. 2022 सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha