शिलाँग : गेल्या दोन आठवड्यांपासून मेघालयमध्ये 15 खाण कामगार कोळशाच्या खाणीमध्ये अडकले आहेत. या खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी शक्य असलेले सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत, अशी प्रतिक्रिया मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी दिली आहे.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या बोगीबील पुलाचे उद्घाटन केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोगीबील पूल उद्घाटन आणि मेघालयात खाणींमध्ये अडकलेले खाण कामगार या दोन्ही घटनांना जोडत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.

राहुल गांधी म्हणाले होते की, "मेघालयमधील एनपीपी-भाजप सरकार तिथे खाणींमध्ये अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाहीत. परंतु त्याचवेळी पंतप्रधान मात्र उद्घाटनांचे कार्यक्रम आणि फोटो काढण्यात व्यस्त आहेत."

यावर आज कॉनराड संगमा म्हणाले की, "खाणींमध्ये अडकलेल्या कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी आम्ही शक्य तितके सर्व प्रयत्न करत आहोत. प्रशासन आणि एनडीआरएफच्या जवानांनी खूप परिश्रम घेतले आहेत. परंतु त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. आतापर्यंत खाणींमधून 12 लाख लीटर पाणी बाहेर काढले आहे. परंतु आता असे लक्षात आले आहे. की, पूर्ण नदी खाणीच्या मार्गात आहे. त्यामुळे आमच्या शोधकार्यात अडथळे येत आहेत."