Secunderabad Club Fire : हैदराबादमधील सर्वात जुन्या असलेल्या 'सिकंदराबाद क्लबला'  भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 144  वर्षापूर्वी या सिकंदराबाद क्लबचे बांधकाम करण्यात आले होते. या आगीत कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले आहे. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी अडकेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 


विशेष म्हणजे ब्रिटिश राजवटीत 1878 मध्ये या 'सिकंदराबाद क्लबची निर्मिती झाली होती. हा क्लब 144 वर्षे जुना असून, सुमारे 20 एकर परिसरात पसरलेला आहे. सिकंदराबाद क्लब हा देशातील 5 सर्वात मोठ्या, प्रतिष्ठित आणि जुन्या क्लबपैकी एक आहे. या क्लबमध्ये शहरातील मोठे अधिकारी आणि श्रीमंत व्यापारीच येतात. सामान्य लोकांना येथे येण्यास मनाई आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास या क्लबमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आग इतकी भीषण होती की, ती संपूर्ण क्लबमध्ये पसरली आहे. आगीच्या ज्वाळा लांबून दिसत होत्या.


आग लागल्याची माहिती क्लबच्या व्यवस्थापन विभागाने अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमाक विभागाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. मिळालेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी सुमारे 10 फायर इंजिनांचा वापर करण्यात आला. आग विझवण्यासाठी 4 तासांहून अधिक वेळ लागला. घटनास्थळी प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. सुट्टीमुळे क्लबमध्ये कोणीही पाहुणे नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र क्लबमधील सुमारे 20 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीत क्लबच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. काही लोकांच्या म्हणण्यानुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या: