Tonga Tsunami : न्यूझीलंडजवळ पॅसिफिक महासागरच्या किनारपट्टीवर असलेल्या टोंगामध्ये समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. टोंगामध्ये गेल्या 30 वर्षातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा स्फोट आहे. यानंतर टोंगामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. टोंगात समुद्राखाली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपानला त्सुनामीचा तडाखा बसलाय.  यानंतर किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अनेकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. 


टोंगामधील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचे न्यूझीलंडच्या सैन्य दलाने म्हटलंय. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गरज पडल्यास मदतीसाठी सज्ज आहोत असं न्यूझीलंड सैन्य दलाने सांगितलंय. 


राख, वाफ आणि धुराचं साम्राज्य 


न्यूझीलंड लष्कराने सांगितले की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि गरज पडल्यास मदत मागितली तर ते तयार आहे. उपग्रहातून घेण्यात आलेल्या फोटोंमध्ये प्रशांत महासागराच्या निळ्या पाण्यावर पसरलेली राख, वाफ आणि वायू दिसत आहे. टोंगा हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण टोंगासाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. आणि पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राच्या डेटामध्ये 80 सेमी पर्यंत उंच लाटा आढळल्या आहेत. अमेरिकन रहिवाशांना त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला होता. तसेच किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 


त्सुनामी म्हणजे काय?


परिसंस्थांमध्ये आकस्मिक बदल घडवून आणणाऱ्या विशाल सागरी लाटांना जपानी भाषेत त्सुनामी असं म्हणतात. सध्या हाच शब्द सर्वत्र प्रचलित आहे. समुद्राच्या तळभागावर भेगा पडल्यास त्या खळग्यात पाणी घुसते आणि त्या पाण्याचे स्थानांतरण होऊन प्रचंड लाटेची निर्मिती होते. यालाच त्सुनामी म्हटलं जातं. भूकंप, ज्वालामुखी अशा नैसर्गिक घटनांमुळे सागरतळावर भेगा पडल्यामुळे या लाटा निर्माण होतात. 


त्सुनामीच्या लाटांचे स्वरूप समुद्रातील लाटांपेक्षा वेगळे असते. या लाटांची व्हेवलेंथ म्हणजे तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे सागरकिनाऱ्याकडे येणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि त्याची व्याप्ती ही इतर साधारण लाटांपेक्षा जास्त असते. त्सुनामीमुळे येणाऱ्या लाटा या अधिक वेगवान आणि मोठ्या असतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Tsunami : अमेरिकेच्या पश्चिम किनारी प्रदेशाला त्सुनामीचा फटका बसण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा जारी


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा