Delhi Fire : नवी दिल्ली : होळीच्या निमित्तानं दिल्लीतील नरेला येथील बुधपूर भागात आज पहाटे एका गोदामाला भीषण आग लागली. काही वेळातच आगीनं रौद्ररुप धारण केलं. आजूबाजूच्या इतर गोदामांनाही आगीनं आपल्या भक्ष्यस्थानी घेतलं. आगीचं रौद्ररुप पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळालं. आगीच्या ज्वाळा प्रचंड होत्या. काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल 34 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरूच आहे.
अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी
अग्निशमन दलाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाला दुजोरा देताना सांगितलं की, अग्निशमन नियंत्रण कक्षाला सकाळी 6.30 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. एकामागून एक अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचू लागल्या असून आतापर्यंत 34 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांची संख्या 135 हून अधिक आहे. घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी वीरेंद्र सिंह, उपमुख्य अग्निशमन अधिकारी एस के दुआ, विभागीय अधिकारी राजेंद्र अटवाल, मनोज शर्मा यांच्यासह 125 हून अधिक अग्निशमन कर्मचारी आगिवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
एसी, रेफ्रिजरेटर कॉम्प्रेसरच्या गोदामाला आग
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग एका तेलाच्या गोदामाला लागली असून व्हर्लपूल कंपनीच्या गोदामालाही याचा फटका बसला आहे. येथे मोठ्या प्रमाणात मोठी गोदामं बांधली आहेत. एसी, फ्रीज कॉम्प्रेसर आदींच्या मोठ्या गोदामात आग लागली आणि ती हळूहळू जवळच्या किराणा मालाच्या गोदामात पसरली आणि काही वेळातच इतर मोठ्या गोदामांनाही याचा फटका बसला. आग लागल्याचं कळताच गोदामांमध्ये काम करणारे कामगार गोदामातून बाहेर आले. त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पम सर्व गोदामं मात्र आगीत जळून खाक झाली आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :