नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होईल. मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या संदर्भात अंतरिम आदेश आज सुप्रीम कोर्ट देण्याची शक्यता आहे. या अंतरिम आदेशावर मराठा आरक्षणाअंतगर्त पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाचं भवितव्य ठरणार आहे. ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल महाराष्ट्र सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडणार आहेत.
7 जुलैच्या सुनावणीत काय झालं होतं? मागील आठवड्यात म्हणजेच 7 जुलै रोजी न्यायमूर्ती एल. एन. राव यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. सध्याच्या कोरोना व्हायरस महामारीच्या काळात अशा महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी तातडीने करण्याचा आग्रह धरणं योग्य नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. सध्या या सर्व याचिकांवर अंतरिम स्वरुपाचा निर्णय काय देता येईल, ते आम्ही 15 जुलैच्या सुनावणीत ठरवू, असंही न्यायमूर्ती राव म्हणाले होतं.
मराठा आरक्षण कायद्याची वैधता निश्चित करण्यासाठी तीन नाही, तर पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे सुनावणी व्हायला हवी, अशीही एक मागणी होती. मात्र सध्या पाच न्यायमूर्तींनी एकत्रित सुनावणी करणं शक्य होणार नाही, असं स्पष्ट करत न्यायमूर्ती एल. एन. राव यांनी 15 जुलै ही तारीख अंतरिम निर्णयासाठी निश्चित केली होती.
संबंधित बातम्या
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली नाही, याचिकाकर्ते विनोद पाटलांची माहिती
मराठा आरक्षणाच्या वैधतेवर लवकरच नियमित सुनावणी, पुढील बुधवारी अंतरिम आदेशासाठी युक्तिवाद