नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमामध्ये उरी हल्ल्याचा सूड घेणारच असा पुनरुच्चार केला. तसेच या हल्ल्याचा आक्रोश जनतेच्या एकजुटीचं प्रतीक असल्याचेही उद्गार त्यांनी यावेळी काढले.


पंतप्रधानांनी आपल्या कार्यक्रमात उरीमध्ये हल्ला करून नरसंहार घडवणाऱ्य़ा दोषींना शिक्षा देणारच, असा पुनरूच्चार करुन या हल्ल्यातील 18 शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच देशाच्या रक्षणासाठी आपले सैनिक कशा प्रकारे पराक्रम करत आहेत, याची माहिती दिली.

ते म्हणाले की, ''देशवासिय आनंदात राहावेत यासाठी आपले सैनिक सीमेवर पराक्रमांची पराकाष्ठा करत आहेत, असेही ते म्हणाले. नागरिकांना आणि राजकीय नेत्यांना बोलण्याच्या अनेक संधी मिळतात. मात्र सैन्य बोलत नाही. तर आपल्या पराक्रमाच्या माध्यमातून करुन दाखवतं.''

यासोबतच त्यांनी काश्मीरमधील जनतेला शांततेचे आवाहन केले. ते म्हणाले की, ''काश्मीरमधील जनतेला देश-विघातक शक्तींचे मनसुबे समजले आहेत. त्यामुळे त्यांना बाजूला सारुन शांततेच्या मार्गावरुन ते मार्गस्थ झाले आहेत. आपण सर्वजण एकत्र येऊन, नव्या पिढीला उत्तम मार्ग उपलब्ध करुन देऊ.''

ते पुढे म्हणाले की, ''उरीमधील हल्ल्यानंतर भारतीय जनतेत जो आक्रोश निर्माण झाला आहे, तो राष्ट्रीय चेतनेचं प्रतिक आहे. बॉम्ब आणि बंदुकीच्या आवाजातही देशभक्ती प्रकट करण्याचा तो मार्ग आहे.'' असं ते म्हणाले.

पॅरालिम्पिकमधील पदक विजेत्यांचे अभिनंदन

पंतप्रधानांनी यावेळी पॅरालिम्पिकमधील पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी दिव्यांग खेळाडूंनी सामान्य खेळाडूच्या तोडीस-तोड कामगिरी केली असल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी पॅरालिम्पिकमधील गोळाफेकपटू दीपा मलिकचं विशेष कौतुक केलं. ते म्हणाले की, दीपा मलिकने जेव्हा पदकाची कमाई केली तेव्हा, हे पदक आपल्या विकलांगतेलाच हरवले असल्याची प्रतिक्रीया दिली होती.''

स्वच्छ भारत अभियानाची आठवण

पंतप्रधानांनी यावेळी गांधी जयंतीचे औचित्य साधून 'स्वच्छ भारत अभियाना'ची पुन्हा आठवण करुन दिली. ते म्हणाले की, ''दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त मी स्वच्छता हा स्वभाव बनला पाहिजे असं म्हटलं होतं.'' प्रत्येक नागरिकाचं स्वच्छता हे कर्तव्य असलं पाहिजं असे सांगून त्यांनी या अभियानाअंतर्गत शौचालय निर्मितीच्या कामाबद्दल माहिती सांगितली. ते म्हणाले की, ''तुम्ही आता 1969 फोन क्रमांकावर फोन करुन शौचालयांच्या निर्मितीच्या कामासोबतच नवीन शौचालय बनवण्यासाठी अर्जही करु शकाल,'' असे सांगितले.

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची 2 वर्षे