Mann Ki Baat Today Highlights:  पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात(Maan Ki Baat)' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधतात. रविवार (18 जून) रोजी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या 102 व्या भागाचे प्रसारण करण्यात आले आहे. मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित करण्यात येतो. मात्र या महिन्यात हा कार्यक्रम 18 जून रोजी म्हणजेच एक आठवडा आधीच प्रसारित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं की, 'मन की बात हा कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो, परंतु या वेळेस हा कार्यक्रम एक आठवडा आधीच प्रसारित होत आहे.' 


पुढे बोलतांना पंतप्रधांनी म्हटलं की, 'तुम्हा सगळ्यांना माहित आहे, मी पुढच्या आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहे आणि तिथे मी अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असेल. त्यामुळे मी दौऱ्यावर जाण्याआधी तुमच्याशी संवाद साधावा असा विचार केला आणि याहून चांगले काय असू शकते.' 


बिपरजॉय चक्रीवादळाचा उल्लेख


बिपरजॉय चक्रीवादळाचा उल्लेख करत पंतप्रधांनी म्हटलं की, 'दोन ते तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिम भागामध्ये खूप मोठं चक्रीवादळ आलं होतं. गुजरातच्या कच्छ भागामध्ये बिपरजॉय चक्रिवादळामुळे खूप नुकसान झाले. परंतु कच्छच्या लोकांनी ज्या धैर्याने आणि सतर्कतेने या चक्रिवादाळाशी लढा दिलादिला तो तितकाच अभूतपूर्व आहे.'


'एकेकाळी दोन दशकांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर कच्छ कधीही सावरणार नाही असे म्हटले जात होते. परंतु आज हाच जिल्हा देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे की कच्छचे लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानातून लवकर सावरतील', असं देखील पंतप्रधांनी म्हटलं. 


भारताला क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प - पंतप्रधान


पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं की, 'भारताने 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प नक्कीच खूप मोठा आहे.  एक काळ असा होता की क्षयरोगाविषयी समजल्यानंतर कुटुंबातील सदस्य दूर निघून जायचे, पण आजच्या काळात क्षयरोगाविषयी समजले की कुटुंबातील लोकं रुग्णाची व्यवस्थित काळजी घेतात.'


इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीच्या काळावर पंतप्रधानांचे भाष्य 


भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीच्या काळावर देखील पंतप्रधानांनी यावेळेस भाष्य केले. यावर बोलतांना पंतप्रधानांनी म्हटलं की, 'आणीबाणीच्या काळाला आपण कोणीच कधीच विसरु शकत नाही. हा भारताच्या इतिहासातील एक वाईट काळ होता. अनेकांनी या गोष्टीला विरोध करण्यासाठी आपली शक्ती लावली होती. त्यावेळी लोकशाहीवर एवढा अन्याय करण्यात आला होती आजही त्या गोष्टीची आठवण झाली की अंगावर काटे येतात. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना या गोष्टींवर देखील नजर फिरवायला हवी. या गोष्टीच तरुण पिढीला लोकशाहीचा अर्थ आणि महत्त्व शिकवण्यास मदत करतील.' 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PM Modi : साथरोगामुळं जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत, मृदेसह पिकांचं आरोग्य वाढवणं गरजेचं; G-20 कृषीमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे आवाहन