नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 29 नोव्हेंबर रोजी त्यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. त्यांनी मन की बातच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी शेअर केली. आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय. ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.


अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल होणार


मोदी म्हणाले की, अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल करण्यात येत आहे. यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पाहायला मिळेल. यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, यांचाही समावेश असेल, असंही ते म्हणाले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिनांक 12 नोव्हेंबरपासून डॉक्टर सलीम अलीजी यांच्या 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्यांच्या दुनियेमध्ये, पक्षी निरीक्षणासंबंधी अतिशय उल्लेखनीय कार्य केलं आहे.


मोदींच्या संवादातील महत्वाचे मुद्दे
- न्यूझीलँडमध्ये नव्यानं निवडून आलेले संसद सदस्य डॉ. गौरव शर्मा यांनी या विश्वातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृत भाषेतून शपथ घेतली. मी गौरव शर्मा जी, यांना शुभेच्छा देतो.


- लंगरची प्रथा सुरू करणारे गुरू नानकदेवजीच होते. आणि आज आपण पाहिलं की, दुनियाभरामध्ये शीख समुदायाने कोरोना काळामध्ये लोकांना भोजन देऊन कशा प्रकारे आपली परंपरा सुरू ठेवली आहे. मानवतेची सेवा केली. ही परंपरा आपल्या सर्वांना निरंतर प्रेरणा देण्याचे काम करते.


- युवा मित्रांनो,आपण जोपर्यंत शिक्षण घेत असतो, तोपर्यंतच, आपण त्या संस्थेचे विद्यार्थी असतो, मात्र आपण आजन्म तिथले ‘माजी विद्यार्थी’ असतो. दोन गोष्टी कधीही संपत नाहीत- एक आपल्या शिक्षणाचा आपल्यावरचा प्रभाव आणि दुसरी आपल्या शाळा-कॉलेजविषयी असलेली आत्मीयता!


2014 पासून सतत करत आहेत मन की बात
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात.