हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी रिंगणात उभं केलं आहे. त्यामुळे निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हैदराबादेत आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर करण्याचं आश्वासन दिलं.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी शनिवारी तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मलकजगिरी भागात रोड शो केला. यावेळी त्यांनी एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य केले. या रोड शोला प्रचंड गर्दी होती.


"इथं आल्यानंतर मला अनेकांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? असं विचारलं. मी त्यांनी म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही?" असे योगी आदित्यनाथ म्हणाले.





ओवेसी यांनी या निवडणुकीसाठी येथे 51 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. हैदराबाद महापालिका निवडणुकीतही असदुद्दीन ओवेसी यांनी जुन्या हैदराबाद भागातही आपल्या पक्षाचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन देखील त्यांनी या वेळी केलं.