Manipur Women News : मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) सुरूच आहे. राज्यातील दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी मणिपूर पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारपर्यंत (21 जुलै) 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, काल शनिवार (22 जुलै) सहाव्या आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सहावा मुलगा किशोरवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. 19 जुलै रोजी समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये दोन महिलांची एका समुदायाकडून विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर महिलांवर सामूहिक अत्याचार झाल्याचाही आरोप होता. 


मणिपूर पोलिसांनी ट्विट करून दावा केला आहे की, उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत. याबाबत आम्ही सातत्याने छापे टाकत आहोत.


आरोपींना 11 दिवसांची पोलिस कोठडी


पीटीआय या वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, पाचव्या आरोपीची ओळख 19 वर्षीय तरुण आहे. मणिपूरमध्ये 4 मे रोजी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी  अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना शुक्रवारी (21 जुलै) 11 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 


मुख्य आरोपीचे घर जाळण्यात आले


मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर काही तासांनी त्याचे घर जमावाने पेटवून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये मुख्य आरोपी कांगपोकपी जिल्ह्यातील बी फेनोम गावात जमावाला भडकवताना दिसला.


ज्या दोन महिलांबरोबर ही लाजिरवाणी घटना घडली त्यापैकी एक भारतीय लष्कराच्या एका माजी सैनिकाची पत्नी आहे. त्यांनी आसाम रेजिमेंटमध्ये सुभेदार म्हणून काम केले होते आणि कारगिल युद्धातही भाग घेतला होता. या घटनेशी संबंधित व्हिडीओबाबत 21 जून रोजी कांगपोकपी जिल्ह्यातील सैकुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 






काय आहे संपूर्ण प्रकरण?


पीटीआयने या प्रकरणातील एफआयआरचा हवाला देत म्हटले आहे की, जमावाने 4 मे रोजी एका व्यक्तीची हत्या केली होती, ज्याने काही लोकांना आपल्या बहिणीवर बलात्कार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. एफआयआरनुसार, त्यानंतर दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि इतर लोकांसमोर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.  


मणिपूरमध्ये अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीच्या निषेधार्थ 3 मे रोजी 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात आल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


गुजरातमधील जुनागडमध्ये ढगफुटी, चार तासांत तब्बल 8 इंच पाऊस, गिरनार डोंगराळ भागात 14 इंच पाऊस; उत्तराखंड, राजस्थानमध्येही पावसाचा कहर सुरूच