Manipur Violence News : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये (Manipur Violence)  चार महिन्यांनंतरही अशांत आहे. त्यातच मणिपूरमधील या हिंसाचाराबाबत एनआयएच्या (NIA)  तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवण्यामागे म्यानमारमधील काही प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं एनआयएच्या तपासातून समोर आलं आहे.  या प्रकरणी एका संशयीत व्यक्तीला एएनआयने अटक केली आहे. 


म्यानमार आणि बांगलादेशमधील दहशतवादी संघटनांनी विविध जाती समूहांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी कट रचला आहे. म्यानमार आणि बांगलादेशमधील दहशतवादी संघटना कुठल्याही परिस्थितीत मणिपूरमध्ये शांतता नांदू देण्यास इच्छूक नाही आहेत, असं एनआयएच्या तपासात उघड झालं आहे. दरम्यान मणिपूरमधील हिंसाचारात 150 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडो घरे जाळली गेली आहेत. शिवाय हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. 


चुराचांदपूर परिसरातून एका संशयिताला अटक


म्यानमार आणि बांग्लादेशमधील दहशतवादी संघटनांनी विविध जाती समूहांमध्ये  तेढ निर्माण करण्यासाठी भारतात अतिरेकी नेत्यांच्या गटाची भरती केल्याचे समोर आले आहे.  म्यानमार आणि बांग्लादेशातील दहशतवादी गटाचे मणिपूरमधील हिंसाचाराची आग कायम धगधगत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  या प्रकरणी एनआयएने चुराचांदपूर परिसरातून एका संशयिताला अटक केली आहे. जो परदेशातून भारताविरुद्ध रचल्या जात असलेल्या दहशतवादी कटाचा भाग आहे. एचटीने दिलेल्या रिपोर्टनुसार, आरोपीचे नाव सेमिनलून गंगटे  (Seiminlun Gangte) आहे. एनआयएने 19 जुलै रोजी कट रचल्याचा तपास करण्यासाठी  त्याच्या विरोधात  गुन्हा दाखल केला होता.


मणिपूरमध्ये म्यानमारमधील दहशतवादी संघटनांचे अनेक दहशतवादी सक्रिय


एनआयएच्या म्हणण्यानुसार, म्यानमार आणि बांगलादेशातील दहशतवादी संघटना  मणिपूरमधील शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि इतर दहशतवादी उपकरणे खरेदीसाठी निधी देत ​​आहेत.  ज्यांचा पुरवठा सीमेपलीकडून तसेच भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या इतर दहशतवाद्यांना केला जातो. एवढच नाही तर मणिपूरमध्ये म्यानमारमधील दहशतवादी संघटनांचे अनेक दहशतवादी सक्रिय आहेत.  जे जमावात घुसून मणिपूरच्या लोकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ले करतात, त्यामुळे हिंसाचार वाढत आहे. त्यांच्या गोळीबाराचे अनेक कथित व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.


सीमावर्ती भागातून घुसखोरीची शक्यता 


केंद्रीय गृहमंत्रालयालाही घुसखोरांच्या समस्येची जाणीव आहे. म्यानमार - मणिपूर अशी  398  किमीची सीमा आहे. मणिपूरमधील टेंगनौपाल, चंदेल, उखरुल, कमजोंग आणि चुराचंदपूर जिल्हे या सीमावर्ती भागाशी जोडलेले आहेत. या भागातून भारतात घुसखोरीची शक्यता आहे.  अलीकडच्या काळात चुरचंदपूरसह या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, म्हणजेच या दहशतवादी संघटनांचे लोक आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि निषेधाच्या नावाखाली रक्तरंजित खेळ करतात. मणिपूरमधील  हिंसाचार अचानक पेटला नसून त्यामागे म्यानमारच्या दहशतवादी संघटनांचा हात आहे हे उघड आहे.


हे ही वाचा :


NIA Raid : एनआयए ॲक्शन मोडमध्ये! खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात मोठी कारवाई; दिल्ली,उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी