मणिपूर : मणिपूरमधील हिंसाचार (Manipur Violence) काही थांबण्याचं नाव घेत नाही. नुकत्याच झालेल्या गोळाबारामध्ये आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, (31 ऑगस्ट) रोजी मणिपूच्या बिष्णुपूरमध्ये आणि चुराचांदपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही तासांपासून दोन समूहांमध्ये सातत्याने गोळीबार होत आहे. यामध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 18 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिष्णुपूर जिल्ह्यातील खोराईंतकच्या पायथ्याशी आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील चिंगफेई आणि खौसाबुंग भागात गोळीबार झाला. मंगळवार (29 ऑगस्ट) रोजी खोइरेंटक भागात झालेल्या गोळाबारामध्ये एका 30 वर्षीय समाजसेवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर या भागातील हिंसाचार वाढत गेल्याचा सांगण्यात आलं आहे.
आयटीएलएफकडून बंदचे आवाहन
मंगळवारी (29 ऑगस्ट) बिष्णुपूरच्या नारायणसेना गावाजवळ झालेल्या हिंसाचारामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले होते. दरम्यान इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने तात्काळ बंद देखील पुकारला. बुधवारी संध्याकाळी काही तासांच्या शांततेनंतर गुरुवारी (31 ऑगस्ट) सकाळी पुन्हा दोन गटांमध्ये गोळीबार सुरु झाला, त्याच तिघांनी प्राण गमावले. दरम्यान जरी काही जिल्ह्यांमध्ये बंद पुकारण्यात आला असला तरीही अत्यावश्यक सेवा या सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
मणिपूर पोलिसांनी ट्वीट करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, कांगपोकपी, थौबल, चुराचंदपूर आणि इंफाळच्या काही भागांमध्ये सुरक्षारक्षकांनी शोध मोहीम राबवली आहे. या मोहिमेमध्ये शस्त्र, दारुगोळा, स्फोटके आणि इतर काही साहित्य सापडले आहे. सध्या मणिपूरमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 130 अतिरिक्त पोलीस चौकी देखील स्थापन करण्यात आल्या आहेत. तर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत 1,646 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचाराचं सत्र
मणिपूरमध्ये अनुसूचित जमातीचा दर्जा मेतैई समाजाकडून 3 मे रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर राज्यात जातीय हिंसाचार सुरु झाला. ज्यामध्ये आतापर्यंत 160 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारकडून मणिपूरमध्ये सध्या शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण अजूनही हे हिंसाचाराचं सत्र मणिपूरमध्ये सुरुच आहे. दरम्यान मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून वारंवार टीकास्त्र डागण्यात येत आहे. तसेच विरोधीपक्षांचे एक शिष्टमंडळ मणिपूरला जाऊन भेट देखील देऊन आले.
मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी पार पडतेय. दरम्यान या प्रकरणी काही तपसा सीबीआय देखील करत आहे. त्यातच साबीआयकडे सुरु असलेली सर्व प्रकरणं ही सर्वोच्च न्यायालयाने गुवाहाटी उच्च न्यायालयात वर्ग केली आहेत.