Congress Bharat Nyay Yatra: नवी दिल्ली : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर आता काँग्रेस दुसरी यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच काँग्रेस भारत न्याय यात्रेला सुरुवात करणार आहे. यावेळी काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेचा प्रवास मणिपूर ते मुंबई असा असेल. या प्रवासात काँग्रेस 6200 किलोमीटरचं अंतर पार करण्याच्या तयारीत आहे.


'भारत न्याय यात्रा' 14 जानेवारीपासून सुरू होणार असून ती 20 मार्चपर्यंत चालणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या दौऱ्याला हिरवा झेंडा दाखवतील. मात्र, या यात्रेचं नेतृत्व राहुल गांधी करणार की, आणखी कोणी? याबाबत काँग्रेस पक्षाकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.




काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा नेमका उद्देश काय होता? 


काँग्रेसनं राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू केली होती. 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झालेला हा प्रवास जवळपास 5 महिने चालला. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून विविध राज्यातील काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत फिरले. या प्रवासात काँग्रेसनं सुमारे 3500 किलोमीटरचं अंतर कापलं होतं.


काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेचा मुख्य उद्देश 'द्वेष, भीती आणि कट्टरता' या राजकारणाशी लढा देणं हा होता. याशिवाय केंद्र सरकारकडून लोकांच्या आशा-आकांक्षांकडे होणारं दुर्लक्ष आणि राजकीय केंद्रीकरण आणि अन्यायाविरुद्ध लढायचं आहे.


कशी असणार 'भारत न्याय यात्रा'?                 


काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 14 जानेवारी रोजी मणिपूरमध्ये भारत न्याय यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. अशा प्रकारे हा प्रवास अधिकृतपणे सुरू होईल. ही यात्रा 20 मार्चला मुंबईत संपणार आहे. भारत न्याय यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून जाणार आहे. भारत न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे.


'भारत न्याय यात्रा' असं नाव का दिलं?   


काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांना या यात्रेचं नाव न्याय यात्रा का ठेवलं? असं विचारलं तेव्हा ते म्हणाले की, आम्ही जनतेला आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देऊ, असं आश्वासन देऊ इच्छितो. पहिली यात्रा 12 राज्यांतून गेली, तर दुसरी यात्रा 14 राज्यांतून जाणार आहे.