Manipur Landslide : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. येथील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बूस्खलनामधील मृताची संख्या वाढतच आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील मृताची संख्या 81 वर पोहचली आहे. यामध्ये लष्करातील जवानांसह सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. या दुर्घटनेमध्ये 30 पेक्षा जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. मणिपूर राज्याच्या इतिहासातील ही सर्वात वाईट घटना असल्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सांगितले. दरम्यान, ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. खराब हवामान आणि वारंवार भूस्खलन होत असल्यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळे येत आहेत. परंतु, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. 


भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार,  TA च्या 107 तुकड्यांना 29 जूनच्या रात्री नोनी जिल्ह्यातील तुपल रेल्वे स्टेशनजवळ जोरदार भूस्खलनाचा फटका बसला. बांधकामाधीन मणिपूर-जिरिबाम रेल्वे मार्गाचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी तैनात असलेले सैनिक उपस्थित होते. भूस्खलनाच्या घटनेनंतर भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने बचाव कार्य सुरू केले. मलब्याखाली अद्याप काही लोक अडकले असल्याची भीती आहे. बचाव कार्य अद्याप सुरु आहे. एनडीआरएफ, सेना आणि स्थानिक पोलीस असे जवळपास 200 पेक्षा जास्त जण बचावकार्य करत आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रावारी संध्याकाळपर्यंत 19 मृतदेह मिळाले आहेत. यामध्ये 10 जवानांचा समावेश आहे. या मलब्याखाली आणखी काही लोक अडकले असल्याची शक्यता आहे. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. लष्कराच्या म्हणण्यानुसार, खराब हवामान आणि पुन्हा भूस्खलन झाल्यामुळे त्याचा बचाव कार्यावर परिणाम होत आहे.  मात्र बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. लष्कराचे हेलिकॉप्टरही बचाव कार्यासाठी तयार असून ते हवामान साफ ​​होण्याची वाट पाहत आहेत.


लेफ्टिनेंट जनरल आर.पी. कलिता यांनी शुक्रवारी घटनास्थळाला भेट दिली. मदत आणि बचाव कार्य चालू असलेल्या यंत्रसामग्रीचा उपयोग रेल्वेच्या साइट इंजिनीअरिंग प्लांटमधून मदत आणि बचाव कार्यासाठी करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे साडेपाच वाजेपर्यंत  13 जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींवर आर्मी मेडिकल युनिट येथे उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी जवानांना इम्फाळ आणि इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 30 पेक्षा जास्त जण बेपत्ता असल्याचं समजतेय.