Manipur Landslide : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. आताच्या अपडेट्सनुसार या घटनेत सात जवानांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकले असल्याची शक्यता आहे. यात काही जवान देखील आहेत, अशी माहिती मिळत आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याची माहिती असून खराब हवामान आणि सातत्यानं भूस्खलन सुरु असल्यानं मदतकार्यात अडथळे येत आहेत. 


इम्फाळ-जिरिबाम रेल्वे मार्गाच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. याच ठिकाणी भूस्खलन झाले आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली.  ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या जवानांना आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. 


भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार,  TA च्या 107 तुकड्यांना 29 जूनच्या रात्री नोनी जिल्ह्यातील तुपल रेल्वे स्टेशनजवळ जोरदार भूस्खलनाचा फटका बसला. बांधकामाधीन मणिपूर-जिरिबाम रेल्वे मार्गाचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी तैनात असलेले सैनिक उपस्थित होते. भूस्खलनाच्या घटनेनंतर भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने बचाव कार्य सुरू केले.


Manipur Landslide : मणिपूरच्या नोनीमध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली 25 जवान दबले, अनेक जण बेपत्ता


मदत आणि बचाव कार्य चालू असलेल्या यंत्रसामग्रीचा उपयोग रेल्वेच्या साइट इंजिनीअरिंग प्लांटमधून मदत आणि बचाव कार्यासाठी करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे साडेपाच वाजेपर्यंत  13 जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. सर्व जखमींवर आर्मी मेडिकल युनिट येथे उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी जवानांना इम्फाळ आणि इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. 


खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. लष्कराच्या म्हणण्यानुसार, खराब हवामान आणि पुन्हा भूस्खलन झाल्यामुळे त्याचा बचाव कार्यावर परिणाम होत आहे.  मात्र बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे.