दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये (Manipur) सुरु असलेल्या हिंसाचारासाठी (Violence) मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना जबाबदार ठरवले जात आहे. गुरुवार (24 ऑगस्ट) रोजी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्गदर्शन केले.'तसेच त्यांच्या मार्गदर्शनानंतर राज्यामध्ये शांतता निर्माण झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार बिरेन सिंह यांना म्हटलं की, 'आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा सल्ला घेत आहोत. संसदेतील पंतप्रधान मोदी यांचं मणिपूरवरील भाषणानंतर राज्यामध्ये सध्या शांतता आहे.' दरम्यान लोकांचे पुनर्वसन करण्याचे काम सध्या सुरु असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमत्री एन बिरेन सिंह?
मणिपूरच्या हिंसाचारावर राहुल गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. यावर बोलतांना बिरेन सिंह यांनी म्हटलं की, 'राहुल गांधी हे लडाखच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी लडाखविषयी बोलावं. आज मणिपूमध्ये जे घडत आहे त्यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. माणसांच्या आयुष्याशी राजकारण केलं नाही पाहिजे.'
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी घेतली अमित शाह यांची भेट
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी गुरुवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील सद्य परिस्थितीची कल्पना अमित शाह यांना दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देखील त्यांनी यावेळी अमित शाह यांना दिली आहे.
या बैठकीमध्ये मणिपूरच्या राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री देखील होते. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याआधी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटलं होतं की, 'आम्ही इथे गृहमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत.' 29 ऑगस्ट रोजी मणिपूरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.
मणिपूरच्या स्थितीविषयी सांगताना बिरेन सिंह यांनी म्हटलं की, 'मणिपूमधील स्थिती हळूहळू सुधारत आहे. मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जातीय दंगली सुरु आहेत. यामध्ये आतापर्यंत 160 पेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.