Mangal Pandey : इंग्रजांविरुद्ध क्रांतीचं पहिलं पाऊल उचलणारे क्रांतिकारक म्हणून मंगल पांडे यांचं नाव इतिहासात सुर्वणअक्षरांनी लिहिलं आहे. आज त्यांची 194 वी जयंती आहे. त्यांनी पुकारलेल्या विद्रोहामुळंच पहिल्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात 1857 साली झाली. त्यांनी  29 मार्च 1857 रोजी इंग्रजांविरुद्ध कोलकात्यातील बराकपूरमध्ये एका अधिकाऱ्यावर हल्ला करत या लढ्याची मशाल पेटवली.  


मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात 19 जुलै 1827 रोजी झाला.  ज्या वेळी 1849 साली, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली, त्यावेळी ते 22 वर्षाचे होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या 34 व्या बी. एन. आय तुकडीच्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील 19 व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेली आहे, अशी माहिती मिळाली होती. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागायचे. 


अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला. त्यांनी ब्रह्मदेश (म्यानमार)हून गोर्‍या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला निःशस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.


सार्जंट मेजर ह्यूसन याने त्यांना पकडायला सांगितलं. त्यावेळी मंगल पांडे यांची गोळी लागून ह्यूसन जखमी झाला. हे पाहताच लेफ्टनंट बॉ घोडा नाचवत मंगल पांडेंवर चाल करून आला. एवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह आडवा झाला. मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळ्या भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मंगल पांडे यांनी तिळमात्रही न डगमगता आपली तलवार उपसली. बॉने पिस्तुल झाडले; पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले. ह्यूसन व बॉ आपल्या निवासस्थानांकडे पळून गेले.


त्यानंतर जनरल हिअर्स अनेक शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला. तोपर्यंत दुपार झाली होती. मंगल पांडे थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार, हे पाहताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली व स्वतःवर गोळी झाडून घेतली. मंगल पांडे धरणीवर कोसळले आणि त्यांची शुद्ध हरपली. नंतरच ब्रिटिश त्यांना पकडू शकले. त्यानंतर पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.  

(या बातमीसाठी काही माहिती विकिपीडियावरुन घेण्यात आली आहे.)