हैदराबाद: मुंबई पोलिसांना विमान हायजॅक करण्याबाबतचा ई-मेल पाठवणारा आरोपी सापडला आहे. हैदराबाद टास्क फोर्सने 32 वर्षीय व्यावसायिकाला (बिझनेसमॅन) बेड्या ठोकल्या आहेत.

धक्कादायक म्हणजे गर्लफ्रेंडची मुंबई ट्रिप कॅन्सल व्हावी, यासाठीच 15 एप्रिलला हा धमकीचा बनावट मेल पाठवल्याचं सांगण्यात येत आहे.

एम व्ही कृष्णा असं या आरोपीचं नाव आहे. कृष्णा हा हैदराबादेत एक ट्रान्सपोर्ट बिझनेस चालवतो.

कृष्णा विवाहीत असून त्याला एक मुलगीही आहे.

कृष्णाची चेन्नईच्या एका महिलेशी फेसबुकवरुन ओळख झाली होती. या ओळखीचं मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात रुपांतर झालं होतं. ही महिला मुंबई आणि गोव्याला जाणार होती.

महिलेने कृष्णाला तीचं मुंबईचं तिकीट बुक करण्यास सांगितलं होतं. तसंच 16 एप्रिलला भेटण्यासही सांगितलं होतं.

मात्र कृष्णाकडे यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने चेन्नई- मुंबईचं बनावट तिकीट बनवून महिलेला पाठवलं. त्यानंतर त्याने मुंबई पोलिसांना खोटा मेल पाठवून, 6 जण विमान हायजॅक करण्याचा कट रचत असल्याची माहिती दिली.

आपली गर्लफ्रेंड एअरपोर्टवर जाऊ नये, तसंच विमान हायजॅकच्या मेलमुळे एअरपोर्टवरील सुरक्षा व्यवस्था वाढवली जाईल आणि तीचा मुंबई दौरा रद्द होईल, असं त्याचा अंदाज होता.

संबंधित बातम्या

मुंबई पोलिसांना विमान हायजॅकबाबत ईमेल, सुरक्षेत वाढ