वाराणसी : वाराणसीतील अपेक्स नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं कॉलेज प्रशासनाकडून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर यासंदर्भात न्यायासााठी विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून मदत मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संसदीय जनसंपर्क कार्यालयाला रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं आहे. या पत्रातून पंतप्रधानांकडे आपल्या अधिकारांची मागणी केली आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
गेल्या काही दिवसांपासून अपेक्स नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी फसवणुकीविरोधात आंदोलन करत आहेत. कॉलेज प्रशासनावर या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, कॉलेजची मान्यता नसल्याने ते विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत नाहीत. मात्र, याबाबत जाब विचारल्यानंतर याबाबत कॉलेज प्रशानाकडून अश्लिल शब्दात उत्तर देऊन उडवाउडवी केली जाते.
विद्यार्थ्यांनी याबाबत लंका पोलिस ठाण्यात तक्रारही केली होती. सप्टेंबर 2015 मध्ये अपेक्स कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये बीएससी नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश घेतले होते. मात्र, 20 महिन्यांपर्यंत कुणाही विद्यार्थ्यांच्या परीक्षाच झाल्या नाहीत.
कॉलेजच्या या सर्व प्रकाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी 7 एप्रिलला लंका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर 8 एप्रिलला तक्रारीनंतर बनवल्या गेलेल्या तपास अधिकाऱ्यांसमोर गेले. तपास अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांनी सर्व प्रकार सांगितला.
10 एप्रिल रोजी विद्यार्थी हीच तक्रार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले आणि त्यांना सर्व प्रकार सविस्तरपणे कळवला. यावेळी कॉलेजची प्रवेश फी परत करण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं.
यानंतर या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव, आयुक्त सगळ्यांना भेटून कॉलेजच्या फसवणुकीचा प्रकार मांडला आणि न्यायाची मागणी केली. मात्र, सर्वच ठिकाणाहून केवळ निराशा पदरी पडली.
अखेर कॉलेजच्या फसवणुकीला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून पाठवले.
उत्तर प्रदेशमधील अधिकारी आणि सरकारकडून कायमच निराशा पदरी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मते, महिला सुरक्षा इत्यादी गोष्टी केवळ माध्यमांमध्ये आहे. मात्र, वास्तव खूप वेगळं आहे. आम्ही आमच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी उन्हा-तान्हातून अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहोत. मात्र, तरीही कुणी ऐकून घेत नाही. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींना रक्ताने लिहिलेल्या पत्रामुळे काहीतरी फरक पडेल, अशी आशा विद्यार्थ्यांना आहे.