सिगरेटचं व्यसन जडवणाऱ्या मित्राची कॅन्सरग्रस्त तरुणाकडून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2017 02:53 PM (IST)
म्यानमारमध्ये राहणाऱ्या इनायत नावाच्या सहकाऱ्याच्या प्रभावातून आपण सिगरेटच्या नादी लागलो, म्हणूनच आपल्याला कॅन्सर झाला, अशी समजूत मुस्तकीमने करुन घेतली.
नवी दिल्ली : सिगरेट पिऊन घशाचा कर्करोग झालेल्या 25 वर्षीय तरुणाने मित्राची गोळ्या झाडून हत्या केली. मित्राच्या संगतीने सिगरेट पिण्याचं व्यसन जडलं आणि आपल्याला घशाचा कर्करोग झाला, या समजुतीतून मुस्तकीम अहमदने इनायतचा जीव घेतला. पश्चिम दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये मुस्तकीम कूक म्हणून काम करायचा. सिगरेटच्या आहारी गेल्यामुळे त्याला घशाचा कर्करोग झाला. म्यानमारमध्ये राहणाऱ्या इनायत नावाच्या सहकाऱ्याच्या प्रभावातून आपण सिगरेटच्या नादी लागलो, म्हणूनच आपल्याला कॅन्सर झाला, अशी समजूत त्याने करुन घेतली. त्याच रागातून त्याने इनायतचा काटा काढण्याची योजना आखली. मुस्तकीम आणि इनायत एकाच ठिकाणी नोकरी करायचे. मात्र चांगल्या कामगिरीमुळे इनायत सर्वांचा लाडका झाल्याची सल मुस्तकीमच्या मनात होतीच. त्यातच इनायत सोबत राहून मुस्तकीमला सिगरेट आणि मारिजुआनाचं व्यसन जडलं. घशाचा संसर्ग झाल्याने डॉक्टरांना दाखवलं असता मुस्तकीमला कर्करोग झाल्याचं निदान करण्यात आलं. यामुळे त्याच्या मनातील रागात भरच पडली. कामाचा दर्जा घसरल्याने मुस्तकीमला कामावर काढून टाकण्यात आलं. याच खदखदीतून इनायतचा जीव घेण्याचं मुस्तकीमने मनाशी निश्चित केलं. उत्तर प्रदेशातील मूळ गावी जाऊन त्याने बंदूक खरेदी केली. नेम चुकू नये म्हणून इनायतची हत्या करण्यापूर्वी मुस्तकीमने खूप वेळा सरावही केला होता. इनायतसोबत मुस्तकीमने वाद उकरुन काढला. त्याचवेळी खिशातून बंदूक काढून मुस्तकीमने त्याच्यावर गोळीबार केला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत इनायतचा मृत्यू झाला होता.