मुंबई : ममता बॅनर्जी खऱ्या बंगालच्या वाघीण आहेत, त्यामुळे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक न लढता त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय होवो अशी आमची इच्छा आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.


शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. ममता बॅनर्जी खऱ्या बंगालच्या वाघीण आहेत, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये निवडणूक न लढता त्यांना पाठिंबा देण्याचं शिवसेनेने ठरवलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाने 26 फेब्रुवारी पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. परंतु सर्वाधिक नजर लागली आहे ती पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीकडे.


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "शिवसेना पश्चिम बंगाल निवडणूक लढवणार की नाही याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. पक्षाचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सर्व असा सामना रंगलेला दिसत आहे. सर्व एम - मनी, मसल अॅण्ड मीडिया (पैसा, ताकद आणि मीडिया) चा वापर ममता दीदींविरोधात वापरलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय होवो, कारण आम्हाला वाटतं की त्याच खऱ्या बंगालच्या वाघीण आहेत"





पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 27 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी पार पडेल. तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.


पहिला टप्पा - 27 मार्च मतदान
दुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदान
तिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदान
चौथा टप्पा - 10 एप्रिल मतदान
पाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदान
सहावा टप्पा - 22 एप्रिल मतदान
सातवा टप्पा - 26 एप्रिल मतदान
आठवा टप्पा - 29 एप्रिल मतदान
मतमोजणी - 2 मे