मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा जिंकल्यास देशातील ही शेवटची निवडणूक असेल, अशी भीती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी व्यक्त केली आहे. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी 2024 च्या लोकसभा निवडणुका ही शेवटची संधी असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलं. ओडिसामधील 23 जानेवारी मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
देशात सध्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांचं वातावरण तयार झालं आहे. त्यातच प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आलीये. मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्यासह आरएसएसवर देखील भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदींनी 2024 ची देखील निवडणूक जिंकली तर देशात हुकूमशाही येईल. तसेच तुम्ही भाजप आणि आरएसएसपासून दूर राहा, असंही खरगे म्हणालेत.
मल्लिकार्जुन खरगेंनी नेमकं काय म्हटलं?
अजून एक गोष्ट सांगतो, ही शेवटची निवडणूक आहे. मोदीजी पुन्हा आले तर पुन्हा देशात निवडणूक होऊ देणार नाही. देशात हुकूमशाही येईल. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, आम्ही अजूनही पाहतोय, परवा आमच्या एका हिरावून नेलं. नोटीस देऊन, घाबरवणं, धमक्या देण्याचं काम सुरु आहे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं.
रशियासारखीच भारताची अवस्था होईल - मल्लिकार्जुन खरगे
भीतीपोटी कुणी मैत्री सोडत आहेत, कुणी पक्ष सोडत आहेत, कुणी युती सोडत आहेत, अहो, एवढेच भयभीत लोक राहिले तर हा देश टिकेल का, हे संविधान टिकेल का, ही लोकशाही टिकेल का, म्हणून ही शेवटी संधी आहे तुम्ही मतदान करण्याची. कारण यानंतर तुम्हाला मतदान करता येणार नाही, कारण रशियात पुतिन यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक जशी असते, तशीच निवडणूक भारतात सुरु राहिल.
'एक व्यक्ती गेल्याने इंडिया आघाडीला काही फरक पडणार नाही'
नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपसोबत पुन्हा नवं सरकार स्थापन केलं आहे. विशेष म्हणजे नितीशकुमार यांनीच विरोधकांची एकजूट असलेली इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच आता त्यांनी इंडिया आघाडीतून देखील माघार घेतलीये. यावर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, एक व्यक्ती गेल्याने इंडिया आघाडी कमकुवत होणार नाही. आम्ही भाजपला हरवूच.