पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा भाजपची वळचण पकडल्याने राजकीय उलथापालथ झाली आहे. नितीशकुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत ईडीने एक्स्प्रेस वेगात कारवाई सुरु केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांची आज (29 जानेवारी) पाटणा ईडी कार्यालयात जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात तब्बल 5 तास चौकशी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान सीआरपीएफचे 15 जवान ईडी कार्यालयात पोहोचले. बाहेरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लालूंच्या समर्थकांमध्येही नाराजी दिसून येत आहे. केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. बिहार सरकारमधून हकालपट्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी लालू यादव यांच्यावर कारवाई करण्यात आली.
ईडी कार्यालयाबाहेर आरजेडी कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची गर्दी
लालूंची चौकशी करण्यासाठी ईडीने जवळपास 50 प्रश्नांची यादी तयार केली होती. आतापर्यंत 40 प्रश्न विचारले गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लालूंनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे होय किंवा नाहीमध्ये दिली आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीन ही संकल्पना का अस्तित्वात आली? तुम्ही हृदय नारायण चौधरी यांच्याशी संपर्क कसा साधला? दानापूरमध्ये 12 हून अधिक जणांना जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्यात आली, तुम्हाला काय म्हणायचे आहे? आदी प्रश्न विचारण्यात आले.
लालू यादव सकाळी 11 वाजता मुलगी मीसा भारतीसोबत पोहोचले. लालूंना सोडून मीसा भारती ईडी कार्यालयासमोरील दादीजी मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या. मिसा यांनी लालूंसाठी ईडी कार्यालयातच जेवण पोहोचवले. दोन वेळा औषधेही देण्यात आल्या. राजद अवघ्या 24 तासांपूर्वी सत्तेपासून दूर झाल्यानंतर लालू यादव यांना ईडीसमोर हजर करण्यात आले. पाटणा येथील ईडी कार्यालयाबाहेर आरजेडी कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची गर्दी जमली आहे.
बदनामी करून राजकीय स्वार्थ साधण्याचे केंद्र सरकारचे धोरण राहिले आहे. भाजपविरोधात आवाज उठवणाऱ्या कोणत्याही विरोधी नेत्याला लक्ष्य केले जात आहे. लालू यादव वृद्ध आहेत. किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. असे असतानाही एजन्सींच्या माध्यमातून छळ आणि नासधूस करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. राजदचे आमदार आणि माजी मंत्री इस्रायल मन्सूरी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
उद्या तेजस्वी यादवांची चौकशी होणार
तेजस्वी यादव यांना 22 डिसेंबर आणि 5 जानेवारीला समन्स बजावण्यात आले होते पण ते हजर झाले नाहीत. उद्या 30 जानेवारीला तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी हजर राहायचे आहे. आज सोमवारी लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगी मिसा भारतीही चौकशीसाठी पाटणा येथील ईडी कार्यालयात पोहोचल्या आहेत.
काय आहे नोकरीसाठी जमीन प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण 2004 ते 2009 मधील आहे. त्यावेळी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घेत कथित गैरव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. महागडी जमीन कवडीमोल भावात घेतली. ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.
दुसरीकडे, या प्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले, "देशातील जनतेला माहित आहे की हे भ्रष्ट लोक आहेत. त्यांच्यासाठी भ्रष्टाचार हा एक रत्न आहे. मी तेजस्वी यादव यांना आवाहन करू इच्छितो की, तरुणांना सांगावे, बिहारमध्येही दीड वर्षात करोडपती कसे व्हायचे हे तंत्र सांगावे.
इतर महत्वाच्या बातम्या