Bharat Jodo Nyay Yatra: नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वात सध्या 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) सुरू आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि इंडिया आघाडीतील (India Alliance) मतभेद चव्हाट्यावर आले. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी इंडिया आघाडीशी काडीमोड घेत वेगळा संसारही थाटला. नितीश कुमार भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) परतल्याच्या एका दिवसानंतर, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमध्ये दाखल होणार आहे. विविध विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे नितीश कुमार, ज्यांच्यामुळे इंडिया आघाडीची स्थापना झाली, त्यांनीच असा वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा आणि इंडिया आघाडीला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
ममता बॅनर्जी, नितेश कुमारांमुळे भारत जोडो यात्रेला धक्का
भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर 'भारत जोडो न्याय यात्रा 2.0'साठी कांग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व पक्ष उत्साहित होते. काँग्रेसकडून यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच या यात्रेबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा होत्या. आगामी लोकसभा निवडणुकींवर या यात्रेचा मोठा परिणाम होऊ शकतो. पण, आधी ममता आणि आता नितीश कुमारांचं इंडिया आघाडीतून बाहेर पडणं यामुळे राहुल गांधींच्या यात्रेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी आणि नितेश राणे यांचा आघाडीतून बाहेर पडण्याचा टायमिंग भाजपनं ठरवलाय, यामागील मूळ हेतू राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं महत्त्व कमी करणं हाच होता.
नितीश कुमारांचा इंडिया आघाडीशी काडीमोड
इंडिया आघाडीतून बाहेर पडून नितीश कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी आघाडीच्या संभाव्यतेला मोठा धक्का दिला आहे. नितीश कुमार विरोधी आघाडीच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक होते, ज्यांची पहिली बैठक त्यांनी गेल्या जूनमध्ये पाटण्यात बोलावली होती. गेल्या काही आठवड्यांमध्ये राजदसोबत तणाव आणि वाढत्या मतभेदाच्या बातम्यांदरम्यान, जेडीयू भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतली आहे. यामुळे आता बिहारमधील जागावाटपावर परिणाम होणार आहे. बिहारमध्ये आता आरजेडी आणि काँग्रेस एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. नितीश कुमार यांचं जाणं इंडिया आघाडीसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. कारण आता निवडणुकीत विरोधकांना प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
जसं बंगाल आणि बिहारमध्ये भारत जोडो यात्रा पोहोचताच ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांना झटका दिला, तसाच प्रकार महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा पोहचल्यावर मोठा धक्का देण्याच्या तयारीत भाजप असल्याच बोललं जात आहे. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील मोठे नेते हे भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे. आता यात कितपत तथ्य असेल, भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर बिहार आणि पश्चिम बंगालप्रमाणेच महाराष्ट्रातील राजकारणातही खळबळ माजणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल, हे मात्र नक्की.