IMD Weather Updates : देशातील अनेक राज्यांमध्ये 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD Weather Updates) वर्तवली आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे हवामान आणखी थंड होऊन तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील हे सर्व मोठे बदल तीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये थंडीची लाट कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दिल्ली, हरियाणा, यूपी, पंजाब, चंदीगड, उत्तर राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तर-पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये किमान तापमान 7 ते 10 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.






दाट धुक्याबाबत यलो अलर्टही जारी 


हवामान खात्याने पंजाबमध्ये दाट धुक्याबाबत यलो अलर्टही जारी केला आहे. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट ते दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिवसा धुके पडण्याची शक्यता आहे. सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान पंजाबमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशमध्ये 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 ते 2 फेब्रुवारी रोजी पंजाबच्या उत्तर भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.






मुसळधार पाऊस/बर्फवृष्टी होण्याची शक्यता


भारतीय हवामान खात्याने सोमवारी (29 जानेवारी) सांगितले की, जानेवारीमध्ये आतापर्यंत उत्तर-पश्चिम भारतात 97 टक्के पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे. उत्तराखंड, चंदीगड, हरियाणा, दिल्ली आणि पंजाब उपविभागात याचा सर्वाधिक फटका बसलेली राज्ये आहेत, जिथे 99-100 टक्के पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे. हवामान खात्याच्या मते, 30 आणि 31 जानेवारीला काश्मीरमध्ये, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला हिमाचल प्रदेशात, 31 जानेवारीला उत्तराखंड आणि 2 फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस/बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्रात काय स्थिती असणार? 


दुसरीकडे, महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान 14 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान 8 ते 10 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यानचे असू शकते.


इतर महत्वाच्या बातम्या