पणजी (गोवा) : गोव्यात नरकचतुर्दशीच्या पहाटे नरकासुराचे दहन करण्याची प्रथा आहे. पेडणेपासून काणकोण तालुक्यापर्यंत प्रत्येक गल्लीत छोटे मोठे हजारो नरकासुर बनवून त्यांचे दहन केले जाते. दिवाळीला जेमतेम 3 दिवस उरले असून सध्या रात्री जागून नरकासुर बनवण्याची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत.


यंदा नरकासुर बनवताना पावसाच्या अडथळ्यांचा सामना नरकासुर बनवणाऱ्यांना करावा लागत आहे. परतीचा पाऊस रात्रीच्या वेळेस लागत असल्याने अनेकांनी मंदिरे, प्लास्टिक शेड यांचा आधार घेतला आहे.

गोव्यात साधारपणे 1 फुटापासून 70 ते 80 फुट ऊंचीचे आक्राळ-विक्राळ नरकासुर बनवले जातात. ठिकठिकाणी नरकासुर स्पर्धाचे आयोजन केलेले असते. या स्पर्धेत भाग घेऊन झाल्यानंतर नरकासुरांचे दहन केले जाते. जे स्पर्धेत भाग घेत नाहीत, त्यांचे नरकासुर रस्त्या शेजारी लोकांना बघण्यासाठी रात्रभर ठेवले जातात. नरकासुर पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली जाते. रात्रीच्या वेळेस सर्वत्र वाहतूक पोलिस तैनात करावे लागतात. नरकासुरांसोबत डॉल्बी डिजिटलचा दणदणात असतो. रात्रभर नरकासुरासमोर स्थानिक युवकांचा डॉल्बीच्या तालावर नाच सुरु असतो.



नरकासुर बनवण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च

छोटा नरकासुर हजार ते दीड हजार तर मोठे नकासुर बनवण्यासाठी जवळपास लाखाच्या घरात खर्च येतो. नरकसुराच्या स्वरुपानुसार हा खर्च कमी जास्त होत असतो.

नरकासुर बनवण्यासाठी शालेय विद्यार्थी सहामाही परीक्षा संपण्याची वाट बघत असतात. परीक्षा संपताच सगळी मूल नरकासुर बनवण्यात मग्न होतात. नरकासुर चोरी होऊ नये, यासाठी मुलांना शेवटच्या रात्री जागवाव्या लागतात.



नरकासुराला लावले जाणारे मुखवटे बनवणारी काही ठराविक कुटुंबं पिढ्यांपिढ्या हे काम करतात.

यंदा पावसाचे सावट नरकासुरांवर असून नरकासुर दहन होईपर्यंत पाऊस पडू नये अशी प्रार्थना अनेकजण करत आहेत.

हिंदू युवकांबरोबर मुस्लिम युवक देखील नरकासुर बनवून त्याचे दहन करणे आणि हिंदूं सोबत दिवाळी करण्यात सहभागी होतात.