Mahatma Gandhi Birth Anniversary : आज 2 ऑक्टोबर रोजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती आहे. यंदा बापूंची 154 वी जयंती (Gandhi Jayanti 2023) साजरी केली जात आहे. संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. देशभरात स्वच्छता अभियानही राबवलं जात आहे. 'अहिंसा परमो धर्म:' आत्मसात करून बापूंनी आपल्या हयातीतच या विचाराची ताकद जगाला जाणवून दिली. अहिंसक सत्याग्रहाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान देऊन बापूंनी देशाला आणि जगाला अहिंसेचा विचार पटवून दिला. देशांतील अशांतता आणि युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची खूप जास्त गरज आहे. साधी राहणी, उच्च विचार आणि सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारी त्यांची तत्वे आजही जगाला शांततेचा मार्ग दाखवत आहेत.
गांधीजींना 'महात्मा' पदवी कोणी दिली?
मोहनदास करमचंद गांधी यांना 'महात्मा' ही पदवी देशातील काही मान्यवरांनी दिली होती. मात्र, ही पदवी नेमकी कुणी दिली, याबाबत मत-मतांतरे आहेत. 1915 मध्ये राजवैद्य जीवराम कालिदास यांनी त्यांना महात्मा म्हणून संबोधलं, असं म्हटलं जातं. तर स्वामी श्रद्धानंद यांनी त्यांना 1915 मध्येच त्यांना 'महात्मा' ही पदवी दिली होती, असं काही जण सांगतात. काहींच्या मते रवींद्रनाथ टागोर यांनी बापूंना महात्मा पदवी दिली असंही सांगितलं जातं..
महात्मा गांधींना 'राष्ट्रपिता' पदवी कोणी दिली?
साबरमती आश्रमातील स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीजींचे शिष्य सुभाषचंद्र बोस यांनी बापूंना पहिल्यांदा 'राष्ट्रपिता' संबोधलं होतं. 6 जुलै 1944 रोजी त्यांनी रंगून रेडिओवर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हटलं होतं आणि आझाद हिंद सेनेसाठी आशीर्वाद मागितले होते.
गांधीजींचे प्रेरणादायी विचार
महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी महात्मा गांधींबद्दल लिहिलं होतं की, "भावी पिढ्यांचा यावर विश्वास बसणार नाही की, हाड, मांस आणि रक्ताने बनलेली अशी व्यक्ती (महात्मा गांधी) या पृथ्वीवर कधी आली होती." गांधीजींचे जीवन आणि त्यांचे विचार सदैव प्रेरणा देण्याचे काम करतात. त्यांचे विचार वाचल्यावर सहज लक्षात येते की, आज दीडशे वर्षांनंतरही जगाला बापूंची गरज आहे.
महात्मा गांधींचे अनमोल विचार
- एकामागून एक डोळा संपूर्ण जग आंधळं करेल.
- आपली चूक मान्य करणं म्हणजे झाडू मारण्यासारखं आहे, ज्यामुळे जमीन चमकदार आणि स्वच्छ होते.
- माणूस हा त्याच्या विचारांनी निर्माण केलेला प्राणी आहे, माणूस जो विचार करतो तो बनतो.
- स्वतःला जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला मग्न करणे.
- कुणीही स्वत:च्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू शकतो, हा प्रत्येकाच्या आतमध्ये असतो.
- निर्मळ अंत:करणाला जे दिसते, तेच सत्य आहे.
- उद्याचा तुमचा शेवटचा दिवस असल्यासारखे जगा आणि असे शिका की तुम्ही कायम आठवणीत कायम राहाल.
- पृथ्वीवर उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहेत, आपली हाव पूर्ण करण्यासाठी नाहीत.
- अहिंसा म्हणजे भ्याडपणा नाही, अहिंसा हा शूर लोकांचा सर्वोच्च गुण आहे, हिंसेच्या मार्गापेक्षा अहिंसेच्या मार्गावर चालण्यासाठी अधिक धैर्याची आवश्यकता आहे.
- क्रूरतेला क्रूरतेनं प्रत्युत्तर देणं म्हणजे एखाद्याचे नैतिक आणि बौद्धिक पतन स्वीकारणं होय.