नवी दिल्ली : महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप होत असतानाच आता एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानेही या आरोपावर शिक्कामोर्तब केला आहे. महिलावंर सर्वात जास्त अत्याचार होणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. एनसीआरबीने 2015 चा राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल मंगळवारी जाहीर केला.

 

उत्तर प्रदेशमध्ये 2015 या वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या एकूण 35 हजार 527 घटना घडल्या. हा आकडा देशातील एकूण गुन्ह्यांच्या 10.9 टक्के एवढी आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

 

विनयभंगाच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात!

 

2015 मध्ये देशभरात विनयभंगाच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार, महिला विनयभंगाचा आकडा 82 हजार 422 एवढा आहे. धक्कादायक म्हणजे विनयभंगाच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण 11 हजार 713 घटनांची नोंद झाली आहे, तर त्यापाठोपाठ मध्य प्रदेशचा (8,049 घटना) क्रमांक लागतो.

 

सर्वात जास्त महिला अत्याचाराच्या घटना या’ तीन राज्यांमध्ये!

उत्तर प्रदेश – 35,527 घटना

पश्चिम बंगाल – 33,218 घटना

महाराष्ट्र – 31,126 घटना

 

केंद्रशासित राज्यांमध्ये महिला अत्याचारांत घट

 

केंद्रशासित राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या संख्येनं घटल्याचं एनसीआरबीच्या 2015 च्या अहवालातून समोर आले आहे. लक्षद्विपमध्ये महिला अत्याचाराच्या 9 घटना घडल्या आहेत. केंद्रशासित राज्यांमध्ये 2014 साली महिला अत्याचाराच्या घटनांची 3.37 लाख एवढी नोंद केली गेली होती. या संख्येत घट झाली असून, 2015 साली 3.27 लाख घटनांची नोंद झाली आहे.

 

बलात्काराच्या घटना :

 

2015 या वर्षात देशात एकूण 34 हजार 651 बलात्काराच्या घटना घडल्या. 2014 साली 36 हजार 735 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या.

 

सर्वात जास्त बलात्काराच्या घटना या’ तीन राज्यांमध्ये!

मध्य प्रदेश -  4,391 घटना

महाराष्ट्र – 4,144 घटना

राजस्थान – 3,644 घटना

उत्तर प्रदेश – 3,025 घटना

 

चिमुकल्यांवरील अत्याचार :

 

एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2015 या वर्षात POCSO अंतर्गत लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या एकूण 8 हजार 800 घटनांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे यातील 3,149 घटनांमध्ये आरोपी हे पीडिताच्या शेजारच्या घरातील असल्याचे आढळले आहेत. तर 10 टक्के आरोपी हे पीडित चिमुकल्यांचे नातेवाईक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

 

एनसीआरबी म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2015 च्या अहवालानंतर देशातील गुन्हेगारीचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. विशेषत: महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण विशेष लक्षणीय आहे. याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याचीही गरज आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारांचे प्रमाणही वाढले असून, विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

 

महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार होत असताना, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा 2015 चा अहवाल गृहखात्याचे डोळे उघडणारा आहे. त्यामुळे या अहवालाकडे राज्य सरकार किती गांभीर्यानं पाहतं आहे आणि त्याप्रमाणे गुन्हेगारी रोखण्यासाठी कसे पावले उचलत आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.