Maharashtra Politics Shivsena MP : शिवसेनेतील बंडखोर खासदारांकडून आता वेगळा गट स्थापन करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटात सामिल झालेल्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा केली आहे. शिंदे गटाने दिलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयाने बदल सुचवले आहेत. त्यामुळे आता हे पत्र आज संध्याकाळी अथवा उद्या लोकसभा अध्यक्षांना दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बाजूला सारुन एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिंदे गटातील काही शिवसेना खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीत खासदारांची संख्या आणि त्या संदर्भातले नियम यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. लोकसभा सचिवालयाने शिंदे गटाच्या पत्रात बदल सुचवले आहेत. शिंदे गटाने आपले पत्र मुख्य प्रतोदांच्या नावाने द्यावेत अशी सूचना केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत हे शिंदे गटासोबत नाहीत. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांना गटनेता नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर, शिवसेनेतील प्रतोद भावना गवळी या मुख्य प्रतोद म्हणून कायम असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्या नावाने पत्र आणि बारा खासदारांच्या सह्या अशी रचना करून पत्र नव्याने देण्याची सूचना लोकसभा सचिवालयाने केली असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत ,राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. उर्वरित 12 खासदार आता शिंदे गटामध्ये जाणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करत शिंदे गटाने आपली स्वत: ची कार्यकारणी जाहीर केली आहे.
खासदारांबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?
शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. सर्वजण येणार असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या खुप चर्चा सुरु आहे पण मला अद्याप काही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. खासदारांसोबत भेट झाल्यानंतर अधिक माहिती देऊ असेही त्यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत असून सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने निकाल येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.