नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा दिवस. 2016 च्या नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे नेण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं तूर्तास तरी फेटाळली आहे. भविष्यातल्या काही शक्यता कोर्टानं खुल्या ठेवल्या असल्या तरी आजच्या घडामोडींचा मोठा परिणाम केसवर होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात नबाम रेबियाच्या अचूकतेचा मुद्दा सात न्यायमूर्तींकडे तूर्तास तरी जाणार नाही. आज पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं याबाबत महत्वाचा निकाल दिला आहे. या निकालानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण झाले असतील. पण हा गोंधळ दूर करण्यासाठी सोप्या शब्दात समजून घेऊयात आजचा निकाल काय आहे?
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण सात न्यायमूर्तींकडे गेलं नाही याचा अर्थ काय?
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
17 Feb 2023 02:53 PM (IST)
आज पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं याबाबत महत्वाचा निकाल दिला आहे. या निकालानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण झाले असतील. पण हा गोंधळ दूर करण्यासाठी सोप्या शब्दात समजून घेऊयात आजचा निकाल काय आहे?
Feature Photo
NEXT
PREV
Published at:
17 Feb 2023 02:53 PM (IST)
- आज सुप्रीम कोर्टानं नेमका काय निकाल दिला?
नबाम रेबिया निकालाच्या फेरविचाराचा मुद्दा स्वतंत्रपणे, संदर्भहीनतेनं, महाराष्ट्राच्या केसमधला घटनाक्रम लक्षात न घेता करता येणार नाही. नबामच्या केसमधली तत्वं या केसमध्ये लागू होतात की नाही याबाबत अधिक खल गरजेचा आहे. त्यामुळे हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे पाठवायचं की नाही हे मुख्य केसच्या मेरिटबाबतच ऐकून ठरवू.
- याचा अर्थ ठाकरे गटाची मागणी फेटाळली असा होतो का?
- नबामच्या फेरविचाराची एक शक्यता कोर्टानं खुली ठेवली असली तरी तूर्तास ती मान्य झाली नाही. कालही पाच न्यायमूर्तींचंच पीठ हे प्रकरण ऐकत होतं, आता पुढेही पाच न्यायमूर्तींचंच पीठ हे प्रकरण ऐकणार आहे. नबाम रेबियाच्या फेरविचारासाठी सात न्यायमूर्तींचं पीठ बनणं आवश्यक होतं. ते तूर्तास तरी बनलेलं नाहीय. याचा अर्थ ठाकरे गटाची मागणी आज तरी मान्य नाही असाच होतो.
- आता पुढची सुनावणी 21 तारखेला होणार आहे ती कशावर होणार आहे?
- 21 तारखेपासून होणारी सुनावणी ही महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत उपस्थित सर्व सहा याचिकांवर एकत्रितपणे होणार आहे.
- म्हणजे आता नबाम रेबियाच्या अचूकतेचा मुद्दा या केसमध्ये येणारच नाही का?
- असंही नाही, फेरविचार आत्ता नाही हे कोर्टानं म्हटलंय. पण मुख्य केस ऐकताना तसे संदर्भ आणि गरज वाटल्यास याबाबत विचार करु इतकंच कोर्टानं म्हटलं आहे.
- आता या प्रकरणाची सलग सुनावणी होणार का?
- हो, ती शक्यता आहे. ज्या अर्थी पुढच्या मंगळवारचीच तारीख कोर्टानं दिली आहे, ती पाहता आता प्रकरणाची सलग सुनावणी होण्याची शक्यता आहे.
- नबाम रेबियाचा निकाल हा या केसमध्ये इतका महत्वाचा आहे का?
- हो, घटनापीठानं जे दहा मुद्दे निश्चित केले आहेत. त्यात सर्वात महत्वाचा आणि पहिल्या क्रमांकाचा मुद्दा हाच आहे. अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिल्यानंतर उपाध्यक्ष झिरवाळ यांना 16 आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार आहे की नाही याचं उत्तर या नबाम रेबियाच्या निकालात दडलेलं आहे.
- मग आता नबाम रेबियाच्या निकालाच्या फेरविचाराची शक्यता किती आहे?
- महाराष्ट्राच्या केसबाबतीत तरी या निकालाच्या फेरविचाराची शक्यता आता नगण्य आहे. या केसच्या दरम्यान या एकाच मुद्दयावर तीन दिवस सुनावणी करुनही कोर्टानं सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण दिलेलं नाहीय. त्यामुळे महाराष्ट्राच्या केसच्या निकालाआधी पुन्हा याच मुद्द्यावर हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे जाण्याची शक्यता फारच कमी आहे. केवळ नबाम निकालाच्या अर्थाबाबतचे युक्तिवाद होऊ शकतात.
- नबाम रेबियाबाबत फेरविचार लगेच होत नाही, याचा अर्थ ठाकरे गटानं ही केस हारली का?
- आत्ता ही मागणी मान्य नाही झाली याचा अर्थ ठाकरे गटासाठी तो सेटबॅक आहेच. पण मुख्य केसमध्ये पक्षांतर बंदी कायदा, राज्यपालांचे अधिकार असे इतरही अनेक मुद्दे आहेत. त्या मुद्दयांवर कसा युक्तिवाद होतो, कोर्ट काय म्हणतं त्यावर हे अवलंबून आहे.
- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल मग लागणार तरी कधी?
- पुढची सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी आहे. सलग सुनावणी झाली तर 15 मार्चच्या दरम्यानही ही सुनावणी पूर्ण होऊ शकते. त्यानंतर सुप्रीम कोर्ट आपला निकाल राखून ठेवून एप्रिल मे पर्यंत निकाल देण्याचीही एक शक्यता आहे. अर्थात ही एक शक्यताच आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -