India This Week: सरत्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही दिलासा देणाऱ्या तर काही अंगावर शहारे आणणाऱ्या. काही थरकाप उडवणाऱ्या तर काही आनंद देणाऱ्या. खरंतर सरता आठवडा इतर घडामोडींसोबतच राजकीय घडामोडींना गाजला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तपणे घेऊन आलोय...
बुलढाण्यातील अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू
शनिवारी सकाळी अवघा महाराष्ट्र हळहळला तो समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताने... बुलढाण्याजवळील पिंपळखुटा गावाजवळ आज खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातून सात प्रवासी बचावले. विदर्भ ट्रॅव्हल्सची बस काल संध्याकाळी नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. रात्री साडे नऊ वाजता बस यवतमाळला थांबली आणि त्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना झाली. मध्यरात्री 1 वाजून 26 मिनिटांनी बस बुलढाण्यातल्या पिंपळखुटा गावाजवळ पोहोचली आणि दुभाजकाच्या बाजूला असलेल्या एका खांबाला धडकली. या धडकेनंतर बस दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने प्रवाशांना तातडीने बाहेर पडणे शक्य झाले नाही. काहीजण काच फोडून बाहेर येण्यात यशस्वी झाले पण इतर प्रवाशांना ते शक्य झालं नाही. इतक्यातच बसच्या इंधनाच्या टाकीतून इंधनाची गळती सुरू झाली. आणि काही क्षणात इंधनाने पेट घेतला. कोणतीही मदत पोहोचण्याच्या आतच मोठा स्फोट झाला आणि बसमधील 25 प्रवासी आगीत होरपळून मृत्यूमुखी पडले. (वाचा सविस्तर)
भावी अधिकारी गुन्हेगारीच्या गर्तेत? पुण्यात दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती
पुण्यात (Pune News) आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससी (MPSC) करणाऱ्या तरुणीवर तिच्या एमपीएससी करणाऱ्या मित्रानेच कोयत्यानं हल्ला (Crime News) केला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत ही घटना घडली आहे. आधी दर्शना पवार हत्या प्रकरण (Darshana Pawar Murder Case) आणि त्यानंतर समोर आलेली ही घटना यामुळे भावी अधिकारी गुन्हेगारीच्या गर्तेत अडकतायत की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्यातील वर्दीळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेत ही घटना घडली. ज्यावेळी तरुणानं त्याच्या मैत्रिणीवर कोयत्यानं हल्ला केला, त्यावेळी तिच्यासोबत त्यांचा आणखी एक मित्रही होता. तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला. (वाचा सविस्तर)
मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट
तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 3 जुलैनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे परिसरात 5 जुलैनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होत असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ज्यात कोल्हापूर, सातारा, सांगलीसोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे, मराठवाड्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.. (वाचा सविस्तर)
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी
आषाढी एकादशी (Aashadhi Wari 2023) आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. या आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला. (वाचा सविस्तर)
आता गोव्याला जा सुसाट! पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण झालं. भोपाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. भोपाळ (राणी कमलापती) ते इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस, भोपाळ (राणी कमलापती) ते जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, रांची ते पटना वंदे भारत एक्स्प्रेस, धारवाड ते बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस आणि गोवा (मडगाव) ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु झाल्या आहेत. गोवा (मडगाव) -मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही गोव्यासाठीची पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. (वाचा सविस्तर)
तेलंगणाचे मुख्यमंत्री सोलापुरात, विठुरायाचे घेतले दर्शन
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. तर मंत्र्यांसह, आमदार खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावं लागलं. पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळं मोजक्याच कोअर कमिटीच्या लोकांनी के चंद्रशेखर राव यांच्यासोबत मंदिरात सोडण्यात आलं होतं. केसीआर (KCR) यांच्यासोबत त्यांचं आख्ख मंत्रिमंडळ सोलापुरात आले होते. (वाचा सविस्तर)
विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार
भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थरराला सुरुवात होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. कोलकाता आणि मुंबई येथे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत, तर अहमदाबाद येथे फायनल होणार आहे. (वाचा सविस्तर)