Amarnath Yatra 2023 : पवित्र अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी सुमारे 8 हजार भाविकांनी बाबा बर्फानी (Baba Barfani) यांचं दर्शन घेतलं. 1 जुलैपासून पवित्र अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 7,900 भाविक श्री अमरनाथ गुहेत बाबा बर्फानी यांच्या चरणी लीन झाले. शनिवारी पहाटे बालाटल आणि पहलगाम येथून 5,600 यात्रेकरुंना रवाना करण्यात आलं होतं, इतर भक्तगण हेलिकॉप्टर द्वारे तेथे पोहोचले होते. अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे.
यंदाची अमरनाथ यात्रा सर्वात मोठी
अमरनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी मोठ्या सुरक्षा ग्रिडपासून ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टॅगपर्यंत सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहेत. 62 दिवस चालणारी अमरनाथ यात्रा यावेळी शनिवारपासून सुरू झाली आहे. यंदाची अमरनाथ यात्रा आतापर्यंतची सर्वात मोठी यात्रा असल्याचं मानलं जातं आहे. यासाठी तीन लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था तैनात
अमरनाथ यात्रेला मोठा जनसागर लोटण्याची शक्यता असल्याने दहशतवादाचं सावट आहे. यात्रेकरूंसाठी मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यात्रेच्या दृष्टीने सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये लष्कर आणि पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), इंडो-तिबेट सीमा पोलिस (ITBP), सीआयएसएफ (CISF) आणि इतर सुरक्षा दलांचे कर्मचारी यांचा समावेश आहे.
पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्पकडे (Base Camp) जाणाऱ्या मार्गावर आणि अमरनाथ गुहेच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर शेकडो नवीन सुरक्षा बंकर बांधण्यात आले आहेत. ड्रोनसह हायटेक तंत्रज्ञानाचाही सुरक्षा व्यवस्थेसाठी वापर करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर प्रशासन तसेच पोलीस प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहे. पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय परिसरात अतिरिक्त जवानही तैनात करण्यात आले आहेत.
8 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता
यंदा अमरनाथ यात्रेसाठी जास्तीत जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी 2018 मध्ये यात्रेसाठी 2.85 लाख भाविक आले होते. 2011 मध्ये सर्वाधिक 6.35 लाख यात्रेकरू आले होते. तर यंदाच्या वर्षी यात्रेसाठी आठ लाखांहून अधिक भाविक यात्रेसाठी येऊ शकतात, असा जम्मू-काश्मीर प्रशासनाचा अंदाज आहे. कोरोना महामारीमुळे ही यात्रा तीन वर्ष रद्द झाली होती. त्यामुळे यंदाच्या यात्रेला जनसागर लोटण्याचा अंदाज आहे.