Rajesh Tope : राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट BA.4 आणि BA.5 चे रुग्ण आढळून आले आहेत. या व्हेरिएंटचे (Variant) एकूण 7 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी माहिती दिलीय. तसेच बूस्टर डोसबाबतही सांगितले आहे. 


ते 7 रूग्ण आता बरे झाले - आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ओमायक्रॉन BA.4 आणि BA.5 चे रूग्ण राज्यात आढळून आले आहेत, परंतु या व्हेरिएंटची लागण झालेले 7 रूग्ण आता बरे झाले आहेत. ते घरी गेले आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. 


बूस्टर डोसबाबत टोपे म्हणाले...
देशासह राज्यात सध्या कोरोनाची रुग्णवाढ होताना दिसत आहे. मात्र अनेकांनी कोरोना लसीचे 2 डोस घेतले आहेत. त्यामुळे बूस्टर डोस हा स्वेछेवर आहे. परंतु ज्यांना वाटतंय, त्यांनी बूस्टर डोस घ्यावेत, तसेच कोरोनाची संख्या वाढत असल्याने लोकांमार्फत प्रसार होऊ नये यासाठी मास्क वापरत काळजी घेण्याची गरज आहे.


परिचारिकांचा संप सोडवण्यासाठी प्रयत्न करू - राजेश टोपे
विविध मागण्यांसाठी राज्य परिचारिका संघटनांनी राज्यात अनेक ठिकाणी संप पुकारला होता. त्यावर राजेश टोपे म्हणाले, परिचारिका संपावर आहे. आयुक्त आणि उपायुक्त यांच्याशी मी लगेचच बोलणार आहे. संप सोडवण्यासाठी प्रयत्न करू. त्यांच्या रास्त मागण्यांचा आम्ही विचार करू आणि मागण्या मान्य करु असे टोपे म्हणाले.


महाराष्ट्रात प्रथमच ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटची लागण


राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्रात प्रथमच ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनच्या BA.4, BA.5 सबव्हेरिएंटचे सर्व सात रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. BA.4 चे 4 आणि BA.5 चे 3 रुग्ण आहेत. हे सातही रुग्ण पुण्यात आढळल्याची माहिती सरकारने दिली आहे. सात रुग्णांपैकी 4 रुग्ण पुरुष आणि 3 महिला आहे. 5 रुग्णांचं वय 50 पेक्षा जास्त आहे. 2 रुग्ण 20 ते 40 वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 10 वर्षांपेक्षा लहान वयाचा आहे. 


देशात आज पुन्हा कोरोना रुग्ण वाढले
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. एका दिवसाआधी कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर आज पुन्हा कोरोना रुग्ण वाढले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 2745 नवे कोरोनाबाधित आढळले असून सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मंगळवारी दिवसभरात नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2236 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 17 हजार 810 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली. गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र तुलनेनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 2338 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आणि 19 जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे. कोरोनामुळे भारतात एकुण 5 लाख 24 हजार 636 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.