मुंबई : 25 हजार कोटी रुपयांच्या गायींच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार 800 एक जमीन देणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'ने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.


नितीन गडकरी यांनी मागील आठवड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे योगगुरु रामदेव बाबा यांच्या गायींच्या प्रकल्पासाठी विदर्भात एक हजार एकर जमिनीची मागणी केली होती.

त्यानंतर राज्य सरकार रामदेव बाबांच्या या प्रकल्पासाठी विदर्भाच्या हेटी (कुंडी) गावात 800 एकर जमीन देणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी रविवारी केली. गायींच्या या प्रकल्पाची किंमत 25 हजार कोटी रुपये आहे. रामदेव बाबांच्या पतंजली समूहाच्या नेतृत्त्वात हा प्रकल्प सुरु होईल.

प्रकल्पासाठी दहा हजार गायींची खरेदी
या प्रकल्पाअंतर्गत पतंजली दहा हजार गायींची खरेदी करणार आहे. याद्वारे प्रजनन केंद्राचा विकास आणि डेअरली कामाला प्रोत्साहन दिलं जाईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

प्रस्ताव अद्याप आमच्याकडे नाही : सीएमओ  
मात्र या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचारणार केली असता, "अशा आशयाचा कोणताही प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही," असं उत्तर देण्यात आलं.

आधीपासूनच प्रजनन केंद्र सुरु : जिल्हाधिकारी
वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी सांगितलं की, "हेटीमध्ये (कुंडी) राज्याच्या पशुपालन विभागाचं प्रजनन केंद्र आधीपासूनच सुरु आहे. हे केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. पण त्याचा विकास पशुपालन विभागाच्या माध्यमातूनच केला जाईल."

पशुपालन विभागाचेही सवाल
आमच्याकडे देशी गायींसाठी एक प्रजनन केंद्र आहे, जे हेटीमध्ये (कुंटी) आहे आणि त्याचं नाव गालाऊ आहे. हे केंद्र 328 हेक्टर क्षेत्रात पसरलं आहे. त्यापैकी 40.80 हेक्टर क्षेत्र आमच्या विभागाच्या अंतर्गत येतं. तर उर्वरित 227.2 हेक्टर क्षेत्रावर वन विभागाचा अधिकार आहे, असं पशुपालन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी सांगितलं.

आमचा प्रकल्प व्यायसायिक नाही : आचार्य बालकृष्ण
आमचा हा प्रकल्प व्यायसायिक नसेल. सेवाभावी योजना म्हणून आम्हाला हा प्रकल्प सुरु करायचा आहे. हा प्रकल्प मूळत: गायींवर आधारित असेल. याबाबत नितीन गडकरी यांनी आम्हाला तातडीने प्रकल्पाचा एक विस्तृत अहवाल पाठवण्यास सांगितलं आहे. हा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यासाठी तयार केला जाईल, असं पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं.