नवी दिल्ली : रेल्वेने आत्तापर्यंत ट्विटरवरुन अनेक प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण केलं आहे. पण रेल्वेकडून पहिल्यांदाच ट्विटरवरमुळे अमूलची अटर्ली-बटर्ली उत्पादन देशाच्या विविध भागात पोहोचवण्यासाठी सुरु झाली आहे. रेल्वे आणि अमूलकडून ट्विटरद्वारे याबाबत विचारण्यामुळे अमूलच्या उत्पादनांची रेफ्रिजरेटेड पार्सलची पहिली खेप रवाना झाली.


वास्तविक, अमूल कंपनीने जवळपास सप्टेंबरमध्ये भारतीय रेल्वेला ट्विट करुन देशाच्या विविध भागात आपली उत्पादनं पोहोचवण्यासाठी रेल्वे सेवा वापरासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला होता.


अमूलने यासाठी 23  सप्टेंबर रोजी ट्वीट करुन म्हटलं होतं की, “भारतात अमूलची उत्पादनं पाठवण्यासाठी अमूल डेअरी रेल्वेच्या रेफ्रिजरेटेड पार्सल व्हॅनचा वापर करु इच्छिते, यावर काही उपाय सुचवावा.”



त्यावर रेल्वेने अमूलच्या उत्तर देताना रिट्वीट करुन म्हटलं की, “भारतीय रेल्वेला अमूलची ‘अटर्ली बटर्ली द टेस्ट ऑफ इंडिया’ उत्पादनं प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने नाश्वंत पदार्थ उदाहरणार्थ : फळं, भाजीपाला, मांस आणि चॉकलेटच्या वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटेड सेवा सुरु केली होती. पण ही सेवा काही ठराविक मार्गांवरच उपलब्ध आहे.”

रेल्वेने या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर अमूलची पहिली खेप 11 नोव्हेंबर रोजी रवाना झाली. अमूलची ही पहिली खेप रवाना झाल्यानंतर कंपनीने रेल्वेचे आभार मानले आहेत.


अमूलने ट्विटरवरुन आभार मानताना म्हटलंय की, “17 मॅट्रिक टन अमूल लोण्याच्या पार्सलचा पहिला डबा पालनपूर ते दिल्लीसाठी रवाना झाला. अमूलच्या प्रस्तावावर भारतीय रेल्वेने तत्काळ पावलं उचलल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो.”