छिंदवाडा : तो भीक मागून उदरनिर्वाह करत असला तरी पत्नीवरील प्रेमाचे अनोखं उदाहरण त्याने सादर केलं आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका भिकारी दिव्यांगाची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. पत्नीचा त्रास पाहून या भिकाऱ्याने भीक मागून मिळालेल्या पैशातून मोपेड खरेदी केली आहे. पूर्वी हे पती-पत्नी ट्रायसिकलवर भीक मागायचे.


दिव्यांग संतोष साहू हा छिंदवाड्यातील रस्त्यावर भीक मागायचा, मात्र पत्नीवरील प्रेमामुळे तो सध्या चर्चेत आहे. पूर्वी संतोष ट्रायसिकलवर फिरुन भीक मागायचा. मात्र बायकोला उंच-सखल रस्त्यावर ट्रायसिकल ढकलताना त्रास व्हायचा. त्यामुळेच त्याने चार वर्षे पै पै जोडून 90 हजार रुपये जमा केले. यानंतर शनिवारी (21 मे) त्याने त्या पैशातून मोपेड खरेदी केली.


दिव्यांग संतोष साहू यांनी सांगितलं की, "मी छिंदवाडा इथल्या रस्त्यावर भीक मागतो. बायकोला ट्रायसिकल ढकलताना त्रास व्हायचा. त्यामुळे चार वर्षांपासून भीक मागून मिळालेले पैसे साठवून 90 हजार रुपये जमा केले. त्यानंतर त्या पैशातून मोपेड खरेदी केली.


दिव्यांग संतोष साहू आणि त्यांची पत्नी मुन्नी हे अमरवाडा इथले रहिवासी आहेत. संतोष हा दोन्ही पायांनी अपंग आहेत. हे दोघेही दररोज छिंदवाडा बसस्थानकावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. त्याच्याकडे ट्रायसिकलही आहे. यावर संतोष बसतो आणि पत्नी मुन्नीबाई ट्रायसिकल ढकलून मंदिर आणि दर्ग्यात भीक मागण्यासाठी जाते. संतोषने सांगितले की, भीक मागून दररोज 300 ते 400 रुपये मिळतात. याशिवाय लोकांकडून त्यांना दोन्ही वेळचे जेवणही मिळते.


संतोषला शहरातील घाटतल्या रस्त्यांवर ट्रायसिकल चालवता येत नव्हती. अशा स्थितीत बायको ट्रायसिकल ढकलायची, याचं त्याला वाईट वाटत असे. पत्नीनेही मोपेड घेण्यास सांगितले. त्याने चार वर्षांपूर्वी मोपेड घेण्याचे ठरवले. हळूहळू पैसे जमवण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे त्यांनी 90 हजार रुपये गोळा केले.


याआधी छिंदवाड्यातील रस्त्यांवर बारकोडवरुन पैसे घेणाऱ्या एका भिकाऱ्याची जोरदार चर्चा रंगली होती. आता लोकांकडून पैसे मागून दुचाकी विकत घेणारं हे भिकारी दाम्पत्यही चर्चेत आलं आहे.