Akasa Air : भारतीय शेअर बाजारातील 'बिग बुल' अशी ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीच्या 'अकासा एअर' लवकरच उड्डाण भरणार आहे. अकासा एअरने आपल्या ताफ्यात दाखल होणाऱ्या विमानाचा पहिला फोटो शेअर केला आहे. अकासा एअर जुलै महिन्यापासून आपली व्यावसायिक विमान सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच 'अकासा एअर'ला हवाई खात्याकडून  कोड देण्यात आला होता. 


राकेश झुनझुनवाला यांनी मागील वर्षी विमान वाहतूक सेवेत उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर अनेकांच्या लक्ष झुनझुनवालांच्या विमान कंपनीच्या वाटचालीवर आहे. अकासा एअरलाइन्सने आपल्या विमान कंपनीकडून  72 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यातील पहिल्या विमानाचा फोटो अकासा एअरलाइन्सने शेअर केला आहे. “Can’t keep calm! Say hi to our QP-pie!" असे कॅप्शन देत अकासा एअरने आपल्या पहिल्या विमानाचा फोटो अपलोड केला आहे. 


 











जूनमध्ये अकासा एअरला आपल्या ह्या पहिल्या विमानाची डिलिव्हरी मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जुलै महिन्यापासून अकासा एअर आपली व्यावसायिक सेवा सुरू करण्याची दाट शक्यता आहे. 






पहिली विमान सेवा कुठे सुरू होणार?


अकासा एअरने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात अकासा एअरची विमान सेवा मेट्रो शहरातील टिअर-2 आणि टिअर-3 शहरांसाठी असणार आहे. त्याशिवाय ही विमान सेवा देशातील प्रमुख शहरांमध्येदेखील सुरू राहणार आहे. आगामी 12 महिन्यात 18 विमानांचा ताफा तयार करण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. त्यानंतर दरवर्षी 12 ते 14 विमाने ताफ्यात दाखल होणार असल्याची चर्चा आहे.