नीमच (मध्य प्रदेश): 100 कोटींची संपत्ती आणि तीन वर्षांच्या चिमुकलीला सोडून मध्य प्रदेशातील एका दाम्पत्याने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुमीत राठोड आणि अनामिका राठोड असं या दाम्पत्याचं नाव आहे.
नीमचमधील राहणाऱ्या या दाम्पत्याला 23 सप्टेंबर रोजी गुजरातच्या सूरतमध्ये दीक्षा दिली जाणार आहे. साधूमार्गी जैन आचार्य रामलालजी महाराज त्यांना दीक्षा देतील.
अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला सोडणार
सुमीत राठोड हे नीमचमधील प्रसिद्ध व्यायसायिक नाहरसिंह राठोड यांचे नातू आहे. सुमीत आणि अनामिका यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन वर्ष 10 महिन्यांची इभ्या नावाची मुलगी आहे. संन्यास घेण्याच्या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
साधुमार्गी जैन श्रावक संघ नीमचचे सचिव प्रकाश भंडारी यांच्या माहितीनुसार, "नीमचचे मोठे व्यायसायिक असलेल्या राठोड घराण्याची संपत्ती 100 कोटींपेक्षाही अधिक आहे. कुटुंबाने समजावूनही हे तरुण दाम्पत्य संन्यास घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे."
सूरतमध्ये संन्यास घेण्याचा निर्णय
"सूरतमध्ये मागील महिन्यात 22 ऑगस्टला सुमीत यांनी आचार्य रामलाल यांच्या सभेत उभं राहून संन्यास घेण्याचं जाहीर केलं होतं. प्रवचन संपल्यानंतर त्यांनी हातातील घड्याळ आणि इतर वस्तू दुसऱ्या व्यक्तीला दिल्या आणि ते आचार्यांच्या मागे गेले," असंही भंडारींनी सांगितलं.
पतीच्या निर्णयाला पत्नीचं अनुमोदन
दीक्षा घेण्याआधी पत्नीची परवानगी आवश्यक असल्याचं आचार्यांनी सांगितलं. तेव्हा तिथे उपस्थित त्यांची पत्नी अनामिका यांनी दीक्षासाठी परवानगी दिलीच, पण स्वत:ही संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर आचार्यांनी दोघांना दीक्षा देण्यास सहमती दर्शवली, असंही प्रकाश भंडारी म्हणाले.
कुटुंबीयांनीही समजावलं
त्यांच्या या निर्णयानंतर हादरलेलं कुटुंबीय तातडीने सूरतला पोहोचलं आणि त्यांची समजूत घातली. आचार्यांनी तीन वर्षांच्या मुलीचा दाखला देत या दाम्पत्याला संन्यासाची परवानगी दिली नाही. त्यामुळे मागील महिन्यात त्यांची दीक्षा टळली. परंतु यानंतरही सुमीत आणि अनामिका आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर राठोड दाम्पत्य 23 सप्टेंबरला दीक्षा घेणार आहे.
बाल अधिकार आयोगाने हस्तक्षेप करण्याची मागणी
मात्र अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला सोडून संन्यास घेणाऱ्या दाम्पत्यावर टीका होत आहे. नीमचमध्ये बाल संरक्षणासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी सोडून संन्यास घेण्याचा निर्णय योग्य नाही. या दाम्पत्याला पुनर्विचार करायला हवा. बाल अधिकार आयोगाने यात हस्तक्षेप करण्याची मागणी करणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
3 वर्षांची मुलगी आणि 100 कोटींची संपत्ती सोडून दाम्पत्य संन्यास घेणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2017 11:17 AM (IST)
नीमचमधील राहणाऱ्या या दाम्पत्याला 23 सप्टेंबर रोजी गुजरातच्या सूरतमध्ये दीक्षा दिली जाणार आहे. साधूमार्गी जैन आचार्य रामलालजी महाराज त्यांना दीक्षा देतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -