MP Election 2023 :  मध्यप्रदेश निवडणुकीबद्दल अतिशय मोठी बातमी आहे.. भाजपच्या तिसऱ्या यादीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना (Jyotiraditya Scindia) तिकीट दिलं जाऊ शकतं. याचं कारण म्हणजे शिवपुरी मतदारसंघातून अनेकदा आमदार राहिलेल्या शिंदेंच्या आत्या यशोधरा राजे या प्रकृतीच्या कारणामुळे यंदा निवडणूक लढवण्यास इच्छूक नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या जागी ज्योतिरादित्य यांना निवडणुकीला उभं केलं जाऊ शकतं.


निवडणुकीत तिकिट नाकारल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात येते. परंतु सध्या मध्यप्रदेशमध्ये खासदार, केंद्रीय मंत्री अशा बड्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवल्याचे चिन्ह पाहायला मिळाले. तिकिट मिळाली की नाराजी असा वेगळाच पॅटर्न सध्या मध्यप्रदेशमध्ये पाहायला मिळत आहे. याच मालिकेत आता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची देखील भर पडली आहे. ज्योरादित्य शिंदे यांच्या आत्या यशोधरा राजे या शिवराज सिंह यांच्या मंत्रीमंडळामध्ये कॅबीनेट मंत्री आहेत. पण प्रकृतीच्या कारणामुळे त्या यंदा निवडणूक लढणार नाहीत,असे त्यांनी स्वत: जाहीर केले आहे.


ज्या भागामध्ये भाजपला सर्वाधिक आव्हान हे त्या ग्वाल्हेर- चंबळ भागामध्ये ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या घराण्याचे वर्चस्व आहे. जर यशोधरा राजे यंदाच्या निवडणुकीत उतरणार नसतील तर त्यांच्या जागी शिंदे कुटुंबातून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत उत्सुकता आहे. कृषीमंत्री तौमर यांच्यासह इतर तीन केंद्रीय मंत्री भाजपने निवडणुकीसाठी उतरवले आहेत. याच पद्धतीने आता ज्योतिरादित्य शिंदे यांना उतरवले जाणार का? तिसऱ्या यादीत त्यांचे नाव असणार का? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. 


मध्यप्रदेशच्या निवडणुकीत सात खासदारांना ज्यात तीन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश त्या सगळ्यांना विधानसभेसाठीचं तिकीट देण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नरेश तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गनसिंह कुलस्ते यांना भाजपनं विधानसभेत लढायला सांगितलंय. सोबत भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनाही बऱ्याच वर्षानंतर निवडणुकीत उतरायला सांगितलंय.  मध्य प्रदेशात निवडणुका जाहीर होण्याआधी भाजपनं आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्यात. या आआधी 17 ऑगस्टला पहिली यादी जाहीर झाली होती. त्यात 39 आणि सोमवारच्या यादीतही 39 जणांची नावं जाहीर झाली. हे पहिल्यांदाच झालंय की निवडणूक जाहीर व्हायच्या आधीच भाजपनं आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करायला सुरुवात केली आहे.   


हे ही वाचा :


Madhya Pradesh : मध्य प्रदेशची लिस्ट, भाजपमध्ये ट्विस्ट, दोन याद्या जाहीर, तरी मुख्यमंत्र्यांचं नावच नाही, शिवराजसिंहांना 'मामा' बनवलं?