Madhavi Raje Shinde : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवीराजे (Madhavi Raje Shinde) यांचं आज (15 मे) सकाळी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे निधन झाले. 'पीटीआय'नं दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या 'व्हेंटिलेटर'वर होत्या. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनिया तसेच सेप्सिसचा त्रास होता.






माधवीराजे यांच्या निधनावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विटरवर माधवी राजे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे जी यांच्या पूज्य माता श्रीमती माधवी राजे शिंदे यांच्या निधनाची हृदयद्रावक बातमी मिळाली. आई हाच जीवनाचा आधार आहे. मृत्यू हे एक अपरिमित नुकसान आहे.






माधवीराजे समाजसेवेत सक्रिय 


माधवीराजे यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात येणार आहे. माधवीराजे या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या. समाजसेवेत त्या खूप सक्रिय होत्या. माधवीराजे या 24 चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या. हे ट्रस्ट शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या शिंदे गर्ल्स स्कूलच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षाही होत्या.


दिवंगत पती माधवराव शिंदे यांच्या स्मरणार्थ पॅलेस म्युझियममध्ये एक गॅलरीही बांधली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवीराजे यांच्यावर गुरुवारी ग्वाल्हेरमध्ये अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात. गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांची पत्नी आणि मुलगा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुणा-अशोकनगर आणि शिवपुरी येथे होते. दरम्यान, माधवीराजे यांच्या प्रकृतीत चढ-उतार असल्याच्या बातम्याही समोर येत होत्या.


इतर महत्वाच्या बातम्या