लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये वन्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका माथेफिरू तरुणाने आपल्या जन्मदात्या आईसह त्याच्या चार बहिणींचा खून केला आहे. विशेष म्हणजे या सामूहिक हत्याकांडानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडीओदेखील अपलोड केला आहे. या टनेनंतर लखनौ, उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्येही ही खळबळजनक घटना घडली आहे. या शहरातील शरणजित या हॉटेलमध्ये एकाच वेळी पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. 24 वर्षी अरशद नावाच्या माथेफिरू तरुणाने हे हेलावून टाकणारं कृत्य केलं आहे. त्याने स्वत:च त्याची आई आणि चार बहिणींचा अत्यंत निर्घृणपणे खून केला आहे. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हत्याकांड नेमकं कसं घडवून आणलं
मिळालेल्या माहितीनुसार अरशद हा तरुण तसेच खून झालेल्या पाचही महिला 30 डिसेंबर रोजी शरणजित हॉटेलमध्ये थांबण्यासाठी आले होते. हे सर्वजण हॉटेल क्रमांक 109 मध्ये थांबले होते. 31 डिसेंबर 2024 च्या रात्री अरशद (वय 24 वर्ष) आपली आई तसेच चार बहिणींची निर्घृण हत्या केली. या मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांच्याच हातांची नस कापलेली होती. रक्तस्त्राव झाल्यामुळे सर्वांचाच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ही घटना बाहेर येताच लखनौमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनीही तत्परता दाखवून या प्रकरणातील आरोप अरशदच्या मुसक्या आवळल्या. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक कलहामुळे आरोपीने एकूण पाच जणांची हत्या केली आहे.
आरोपीने व्हिडीओदेखील अपलोड केला
लखनौ येथील डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार 24 वर्षीय अरशद हा मुळचा आग्रा येथील रहिवासी आहे. कुटुंबात वाद झाल्यामुळे त्याने हे हत्याकांड घडवून आणले आहे. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. तर पाचही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपीने एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपीने या हत्या केल्याचं मान्य केल्याचं सांगितलं जातंय. तसेच या हत्याकांडात आरोपीचे वडीलही असल्याचं खुद्द आरोपी सांगताना दिसतोय.
हेही वाचा :