KitKat Wrapper Controversy : मल्टी नॅशनल कंपनी नेस्ले (Nestle) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नेस्लेने त्यांच्या किटकॅट (Kit Kat) या चॉकलेटच्या रॅपरवर भगवान जगन्नाथांचे (Lord Jagannath) छायाचित्र छापले होते. यानंतर लोकांनी ट्विटरवरून या कंपनीला चांगलेच ट्रोल केले. त्यानंतर कंपनीने सोमवारी सोशल मीडियाद्वारे माफी मागितली. यासोबतच, कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले की, ते अशी सर्व उत्पादने बाजारातून परत मागवत आहेत.


रॅपरवर छापला भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांचा फोटो


नेस्ले कंपनीच्या किटकॅट चॉकलेटच्या रॅपरवर भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांचे फोटो दिसल्यनंतर अनेक राज्यांनी विशेषत: ओडिशाने यावर आक्षेप घेतला होता. ओडिशातील हजारो लोकांनी ट्विटरवर कंपनीला टॅग केले आणि या फोटोंवर प्रचंड संताप व्यक्त केला.



नेटकऱ्यांनी ट्विटरवर व्यक्त केला संताप!


अनेक युजर्सनी ट्विटरवर फोटो शेअर करून आपला आक्षेप व्यक्त केला आहे. चॉकलेट खाल्ल्यानंतर लोक हे रॅपर रस्त्यावर, नाल्यात किंवा डस्टबिनमध्ये टाकतात, असे आक्षेप घेणाऱ्यांनी सांगितले. या कारणास्तव कंपनीने रॅपरमधून भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि माता सुभद्रा यांचे फोटो काढून टाकावेत अशी मागणी केली होती.




कंपनीने मागितली माफी


लोकांचा विरोध पाहून कंपनीने आता माफी मागितली आहे. तसेच, हा फोटो वापरणार नाही आणि हा माल बाजारातून परत मागवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. नेस्लेने आपल्या निवेदनात म्हटले की, 'लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही माफी मागत आहोत आणि हे उत्पादन मागे घेत आहोत. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.' कंपनीने सांगितले की, त्यांनी या रॅपरवर वापरलेल्या फोटोमागील हेतू ओडिशाची संस्कृती साजरी करणे  हा होता. या फोटोंमध्ये त्यांनी विशेष डिझाईन वापरले होते. मात्र, आता माफी मागत त्यांनी संपूर्ण माल बाजारातून परत मागवला आहे. 



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha