लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी लखनऊ येथील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंटिग्रेटेड टर्मिनल -3 (T3) चे उद्घाटन करण्यात आले. तब्बल 2400 कोटी रुपये खर्चून हे इंटिग्रेटेड टर्मिनल -3 उभारण्यात आले आहे. इंटिग्रेटेड टर्मिनल -3  वरुन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण करतील. गर्दीच्या वेळी या टर्मिनलवर एकाचवेळी  4000 प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता आहे. याचा अर्थ वर्षाला 80 लाख प्रवासी या टर्मिनलचा वापर  करु शकतात. चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंटिग्रेटेड टर्मिनल -3 (CCSIA) चा हा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अनुभव सुखकारक होणार आहे. याठिकाणी बाहेरून येणाऱ्या विमानांसाठी आणि या विमानतळावरुन प्रयाण करणाऱ्या विमानांसाठी स्वतंत्र धावपट्ट्या असतील. टी-3 टर्मिनलाच दुसरा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर या विमानळावरून दरवर्षी 1.3 कोटी प्रवासी ये-जा करु शकतील.



इंटिग्रेटेड टर्मिनल -3 ची वैशिष्ट्ये 


1. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंटिग्रेटेड टर्मिनल -3 टर्मिनलवरुन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमाने उड्डाण करतील.
2. टी-3 टर्मिनलवर चेक-इन, इमिग्रेशन काऊंटर्स आणि बोर्डिंग गेटची संख्या जास्त आहे.
3. प्रवाशांच्या सोयीसाठी इंटिग्रेटेड टर्मिनल -3 वर डिजियात्रा या तंत्रज्ञानाचा वापर करण्या आला आहे.


 


इंटिग्रेटेड टर्मिनल -3 मुळे उत्तर प्रदेशात 13 हजार नोकऱ्यांची निर्मिती: करण अदानी


इंटिग्रेटेड टर्मिनल -3 च्या उद्घाटनावेळी अदानी बंदरे आणि विशेष आर्थिक क्षेत्र लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी यावेळी म्हटले की, चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंटिग्रेटेड टर्मिनल -3 उभारताना आमच्या डोळ्यासमोर एक विशाल आणि दूरगामी ध्येय होते. 2047-48 पर्यंत या टर्मिनलवरुन वर्षाला 3.8 कोटी प्रवासी ये-जा करतील, इतकी क्षमता वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे येत्या काही वर्षांमध्ये  उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याच्या उद्दिष्टाला आम्ही हातभार लावू शकतो. आम्ही याठिकाणी केवळ पायाभूत सुविधान उभारलेली नाही तर या माध्यमातून उत्तर प्रदेशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 13 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार असल्याचे मत करण अदानी यांनी व्यक्त केले.



टर्मिनल-3 च्या स्थापत्यकलेत उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक वारशाची झलक


आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टर्मिनल-3 च्या उभारणीत उत्तर प्रदेशातील कला आणि स्थापत्यकलेच्या वारशाची झलक पाहायला मिळते. टर्मिनल-3 च्या प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंत प्रवाशांना ठिकठिकाणी उत्तर प्रदेशच्या संस्कृतीचे दर्शन घडेल. चेक-इन काऊंटर्सवर 'चिकनकारी'आणि 'मुकैश' पद्धतीची कलाकुसर प्रवाशांचे लक्ष वेधून घेणारी आहे. विमानतळाच्या परिसरात अनेक ठिकाणी रामायण आणि महाभारतामधील प्रसंग चितारण्यात आले आहेत.