कोल्हापूर : मराठा आणि धनगर समाज हे वेगळे असल्याचं मी कधीही मानलं नाही, आपण मटण खाल्ल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे धनगर हे आपले अन्नदाता आहेत असं वक्तव्य कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांनी केलं.  कोल्हापुरात बहुजन समाज एकत्र येत आपली ताकद दाखवत आहेत, कोणताही प्रश्न एकत्रित हाताळला की हात मजबूत होतो असंही ते म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात पार पडला. काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आलं. त्या कार्यक्रमात शाहू महाराज बोलत होते. 


काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून स्मारकाची उभारणी करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार अमित देशमुख, विश्वजित कदम, सतेज पाटील, पी एन पाटील, मालोजीराजे छत्रपती यांची उपस्थिती होती. 


काय म्हणाले शाहू महाराज? 


आज खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच वारसा लाभलेल्या कोल्हापुरात सर्व समाज एकत्र येत बहुजन समाजाची एकता दाखवत आहेत. धनगर समाज वेगळा, मराठा समाज वेगळा असं मला कधीच वाटलं नाही. मी सुद्धा मेंढरं पाळली आहेत, मी सुद्धा धनगर आहे. मराठा समाज न्याय मिळवण्यासाठी जसा धपडत आहे, तसा धनगर समाजासाठीही देखील धपडत आहे. पण एक दिवस न्याय नक्कीच मिळणार यात शंका नाही. मटण खाल्याशिवाय आपण राहत नाही आणि ते मेंढपाळमुळे मिळतं, त्यामुळे ते आपले अन्नदाता आहेत. कोणताही प्रश्न एकत्र हाताळलं की हात मजबूत होतो. 


पुढच्या आठ दिवसात ढोल वाजणार, काठी बडवणार


राज्यात राजकारण कसं सुरू आहे आपल्याला दिसत आहे, सकाळचा माणूस संध्याकाळी कुठं असतो समजत नाही. कोल्हापूर ही समतेची भूमी आहे. येथील धनगर आणि मराठा समाज, कोल्हापूरची जनता ही ऋणानुबंध अधिक चांगली घट्ट होतील. कोल्हापूर जागेसंदर्भात दिल्लीमध्ये बैठक होती, मात्र या कार्यक्रमामुळे गेलो नाही. उर्वरित पुतळ्याचं काम आचारसंहिता संपल्यानंतर नवीन खासदरांकडून करू. पुढच्या 8 दिवसांनी ढोल वाजणार आणि काठी बडवनार आणि आणि भंडारा उधळणार आहे, विचारांनी लढूयात. 


देशाला दिशा देण्यासाठी शाहू महाराजांनी पुढाकार घ्यावा


या कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख म्हणाले की, जिथ कोल्हापूर आणि सोलापूर आहे तिथे सांगली आलीच. देशाला आणि राज्याला योग्य दिशा देण्यासाठी शाहू महाराजांनी पुढाकार घ्यावा आमची सर्वांची इच्छा आहे. कोल्हापुरात आल्यानंतर राज्यात कोणाचं सरकार आहे याचा विसर पडतो. जिकडे तिकडे चोहीकडे सतेज पाटील यांचा आवाज घुमतो. राज्यातील 4 दिग्गज नेते आहेत, त्यापैकी एक सतेज पाटील. हे नेतृत्व आपल्याला जपलं पाहिजे. महाराष्ट्राची सूत्र कोल्हापूरकडे असायला हवीत. 


ही बातमी वाचा: