पाटणा/मुंबई : महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली परिस्थिती पाहता तिथे राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि खासदार चिराग पासवान यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्र वादानंतर शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकाऱ्याला झालेली मारहाण तसंच कंगना प्रकरणावरुन चिराग पासवान यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.


बिहार विधानसभा निवडणुकीआधी राजकारण जोरदार तापलं आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि कंगना प्रकरणावरुन राजकीय पक्षांनी आपापल्या पोळ्या भाजण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही मुद्द्यावर आता लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं म्हटलं आहे.


महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीविषयी बोलताना चिराग पासवान म्हणाले की, "ज्याप्रकारे उत्तर भारतीयांना टार्गेट केलं जात आहे. कंगनाने प्रश्न विचारले म्हणून ज्याप्रकारे तिचं कार्यालय तोडण्यात आलं. तसंच फक्त व्यंगचित्र फॉरवर्ड केलं म्हणून ज्याप्रकारे माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली, असंच वातावरण कायम राहिलं तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय दुसरा पर्याय आहे. लोकांमध्ये सुरक्षेची भावना नसेल, लोकांमध्ये भीतीचं वातावरण असेल आणि सरकारला लोक घाबरतील तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही."


निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण
62 वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी (11 सप्टेंबर) काही शिवसैनिकांनी मारहाण केली होती. मदन शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतच एक व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलं होतं. याच रागातून काही शिवसैनिक त्यांन्या घरी गेले आणि त्यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


दरम्यान, नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 325 आणि दंगलीशी संबंधित तरतुदींअंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांची जामीनावर सुटका झाली. यावरुन भाजप आक्रमक झाली. जी कलम लावण्याची गरज होती ती न लावल्याने आरोपींची सुटका झाली. यावरुनच पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं दिसतं असा आरोप करत भाजपने सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.


निवृत्त नौदल अधिकाऱ्याला बेदम मारहाण, शिवसेना कार्यकर्त्यांना अटक, भाजपची टीका


भाजपचं ठिय्या आंदोलन
मारहाण करणाऱ्यांविरोधात कलम 326 आणि 452 कलम लावण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली. यानंतरच्या त्यांच्या कार्यालयाबाहेर भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्त्वाच ठिय्या आंदोलन केलं. यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा या संदर्भातील कलमांबाबत अभ्यास करुन पुढील कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. तसंच पोलिसांवर सरकारचा दबाव नसल्याचं सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.


सहपोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित
यादरम्यानच प्रवीण दरेकर यांनी फोनवरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केल्यानंतर आजचं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला. मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.