नवी दिल्ली : देशभरातील कामानिमित्त शहरी भागात गेलेले मजूर, कामगार लॉकडाऊनमुळे आपल्या गावी निघाले आहेत. रस्त्यावर या मजुरांच्या रांगाच रांगा लागल्या आहे. हाताला काम नाही, मग खायचं काय या चिंतेत असलेल्या या मजुरांनी अखेर घरचा रस्ता धरला. मात्र वाहतुकीची सोय नसल्याने पायी शेकडो किलोमीटरचं अंतर कापण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. मात्र त्यांच्या हा प्रवास खडतर आणि वेदनादायी आहे. या मजुरांच्या प्रवासाचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरस झाले आहेत. त्यापैकी एक फोटो 38 वर्षीय रामपुकार पंडित यांचा आहे. फोन बोलताना रडतानाचा हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकांचं मन हा फोटो पाहून दुखावलं. या फोटोप्रमाणे रामपुकार यांच्या प्रवासही तितकाच दु;खद आहे. लॉकडाऊनमध्ये अडकल्याने रामपुकारला त्यांच्या मुलाला मृत्यूपूर्वी पाहताही आलं नाही.


पीटीआयचे फोटो पत्रकार अतुल यादव यांनी रामपुकार यांचा हा फोटो काढला होता. रामपुकार दिल्लीतील एका सिनेमागृहात काम करत होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते आपल्या बिहारमधील मुळ गावी निघाले होते. दिल्लीच्या निजामुद्दीन पुलावर बसून रामपुकार आपल्या कुटुंबियांशी फोनवर बोलत होते आणि रडत ढसाढसा रडत होते. त्याचवेळी अतुल यादव यांनी त्यांचा फोटो काढला. त्यानंतर हा फोटो देशभरातील स्थलांतरित मजुरांचं प्रतिक बनला.


रामपुकार बिहारमधील बेगुसराय येथे पोहोचले आहेत. मात्र अद्याप त्यांना आपल्या घरी जाता आलेलं नाही. बेगुसरायमधील एका गावातील शाळेत त्यांना क्वॉरंटाईन करण्य़ात आलं आहे. मात्र आपल्या एक वर्षीय मुलाला मृत्यूपूर्वी पाहता आलं नाही, हे दु:ख रामपुकारला सतावत आहे. ज्यावेळी हा फोटो काढलाय त्यानंतर काही वेळाने रामपुकारच्या मुलाचा मृत्यू झाला होता.


रामपुकारने म्हटलं की, माझा मुलगा एक वर्षाचाही नव्हता. त्याला मृत्यूपूर्वी मला पाहताही नाही आलं. मी पोलिसांना मला सोडण्याची खुप विनंती केली, मात्र मला त्यांनी सोडलं नाही. एक पत्रकार आणि एका महिलेने मला या संकट काळात मदत केली. रामपुकारला अतुल यादव यांचं नाव देखील माहित नव्हतं.


तीन दिवस निजामुद्दीन पुलावर अडकून पडल्यानंतर रस्त्यालगत बसून मी घरी कसं जायचं याचा विचार करत बसलो होतो. त्यावेळी एका पत्रकाराने माझी विचारपूस केली. या पत्रकाराने मला त्यांच्या कारमध्ये बसवून मदत करण्याच प्रयत्न केला. मात्र पुढे जाण्यास पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यानंतर एका महिलेने मला मदत केली. या महिलेने मला जेवण दिलं आणि 5500 रुपयेही दिले. या महिलेनेच माझं विशेष ट्रेनचं तिकीट बुक केलं आणि त्यानंतर मी बिहारमध्ये पोहचू शकलो, असं रामपुकार यांनी सांगितलं.


श्रीमंत लोकांना योग्य ती मदत मिळते. त्यांना परदेशातून विशेष विमानांनी भारतात आणलं जातं. मात्र आमच्यासारख्या गरीब मजुरांकडे दुर्लक्ष केलं जातं. आमच्या जीवनाची काहीच किंमत नाही. आमच्यासारख्या मजुरांचा कोणताचं देश नाही, अशा भावना रामपुकार यांनी व्यक्त केल्या.