नवी दिल्ली सामान्यत: कोणाच्याही वैवाहिक जीवनात तणाव असताना, कायद्यानुसार पत्नी किंवा पतीने दुसऱ्या जोडीदारासोबत राहणे योग्य मानले जात नाही. पण अशाच एका प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने पतीच्या बाजूने निकाल देत दुसऱ्या महिलेसोबत राहणे ही पत्नीवरची क्रूरता मानली नाही. दिल्ली हायकोर्टाने मानवी भावना, संवेदनशीलता लक्षात घेऊन निर्णय दिला आहे.


भारतीय दंड विधान कलम 494 अन्वये, हिंदू विवाह कायद्यान्वये, कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने त्यांचा पती/पत्नी जिवंत असताना (घटस्फोट नसल्यास) दुसरे लग्न करणे हा गुन्हा आहे. भले, त्यासाठी पती अथवा पत्नीने यासाठी परवानगी दिलेली का असेना. 


काय प्रकरण आहे?


पती दुसऱ्या महिलेसोबत राहत असल्याचा आरोप करत एका महिलेने पतीविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला. महिलेचे 2003 मध्ये लग्न झाले होते पण दोघे 2005 मध्ये वेगळे राहू लागले. त्याचवेळी पतीने आरोप केला आहे की पत्नी आपल्याशी क्रूरपणे वागली आणि तिला तिचा भाऊ आणि नातेवाईकांनी मारहाण केली.


या प्रकरणी खटला दाखल करणार्‍या पत्नीने पतीवर आरोप करताना म्हटले की, त्यांच्या कुटुंबाने त्यांचे लग्न मोठ्या थाटात आयोजित केले होते. असे असतानाही पतीने घरच्यांकडून अनेक मागण्या केल्या. तुम्हाला मुलगा होईल असे सांगत सासूने तिला काही औषधे दिली होती. मात्र तिचा गर्भपात करण्याचा त्यांचा उद्देश होता, असेही तिने आरोपात म्हटले आहे. मात्र, या दाम्पत्याला दोन मुले आहेत. 


कोर्टाने असा निर्णय का दिला?


या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हे दोघेही अनेक वर्षांपासून वेगळे राहत असल्याची बाब समोर आली. या दरम्यानच्या काळात पती दुसऱ्या महिलेसोबत राहू लागला. अशा परिस्थितीत जर एखादे जोडपे दीर्घकाळ एकमेकांसोबत राहत नसेल तर त्यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. अशा परिस्थितीत जर पती दुसर्‍या स्त्रीसोबत सुखसमाधानाने आणि शांततेने राहू लागला तर त्याला क्रूरता म्हणता येणार नाही, असेही कोर्टाने म्हटले. 


दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय सुनावताना म्हटले, "घटस्फोट याचिका प्रलंबित असताना प्रतिवादी-पतीने दुसर्‍या महिलेसोबत राहण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांना दोन मुलगे आहेत हे जरी मान्य केले असले तरी विशिष्ट परिस्थितीत याला क्रूरता म्हणता येणार नाही. जेव्हा पक्षकारांना 2005 पासून एकत्र राहत नाही आणि इतक्या वर्षांच्या विभक्ततेनंतर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही आणि प्रतिवादी पती दुसर्‍या स्त्रीसोबत राहून शांतता आणि सुख मिळवू शकतो तर त्याला क्रूरता म्हटली जाऊ शकत नाही. 


हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13(1)(IA) अंतर्गत क्रूरतेच्या आधारावर तिच्या पतीला घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी महिलेची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. 


कोर्टाने महिलेची वागणूक क्रूर ठरवली


हुंड्यासाठी तिचा छळ आणि शोषण होत असल्याचा दावा पत्नीने केला असला तरी ती आपला दावा सिद्ध करू शकली नाही आणि हे क्रूरतेचे कृत्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.


या महिलेने लग्नानंतर दोन मुलांना जन्म दिला. परंतु महिलेने आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाची कोणतीही माहिती दिली नाही, न्यायालयात कोणतेही पुरावे सादर केले नाहीत किंवा पोलिसांत तक्रारही केली नाही. त्याआधारे उच्च न्यायालयाने महिलेचे अपील फेटाळले आणि घटस्फोट मंजूर करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश कायम  ठेवला. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठात सुरू होती.


दुसऱ्या विवाहावर कायदा काय म्हणतो?


कायद्यानुसार, जोडीदारांपैकी एक जिवंत असताना दुसरा विवाह करणे हा भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 494 नुसार दंडनीय गुन्हा मानला जातो. या कलमानुसार दुसरे लग्न केल्यास सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.


भारतात दोन प्रकारचे विवाह आहेत. एक विवाह वैयक्तिक कायद्यानुसार आणि दुसरा विशेष विवाह कायदा, 1956 अंतर्गत होतो. दोन्ही कायद्यांमध्ये पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे हा दंडनीय गुन्हा मानला जातो. उदाहरणार्थ, हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 17 मध्ये दुसऱ्या लग्नासाठी शिक्षेचा उल्लेख आहे.