Protest March LIVE UPDATES | देशभरात एल्गार, कामगार संघटनांचा बंद तर मनसेचा मोर्चा

संविधान दिवस अर्थात 26 नोव्हेंबरचा मुहूर्त साधत आज कामगार संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. वाढीव वीज बिलाविरोधातील मनसे राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Nov 2020 01:35 PM
नागपुरात संविधान चौकातून मनसेचा वाढीव वीज बिल रद्द करण्याचा मागणी करण्यासाठीचा मोर्चा मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी संविधान चौकाजवळ आरबीआय समोर मनसेचा मोर्चा बॅरिकेट लावून अडवला. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याची परवानगी दिली नाही.
पुण्यातील मनसे आंदोलनाचा समारोप . फरासखाना पोलिस स्टेशन समोर मनसे कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. सहाय्यक पोलिस आयुक्तांनी मनसे कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मधील आंबोली येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, पाणी बचाव संघर्ष समिती, कष्टकरी संघटनेमार्फत रास्ता रोको करण्यात आला. कार्यकर्त्यांनी हा महामार्ग रोखून धरला असून यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर आंबोली येथे उड्डाणपूल करा, प्रत्येकाला रेशनिंग दिल गेलं पाहिजे ,   भरमसाठ वीज बंद करा ,  मागेल त्याला योग्य मोबदला देऊन काम द्या अशा विविध मागण्या करत रास्ता रोको करण्यात आला . 
कोरोना काळात सर्वसामान्य लोकांना विज मंडळाने पाठवलेली हजारो रूपयांची बिले कमी करण्यात यावी यासाठी मनसे कडून आज आंदोलन हाती घेण्यात आले आहे. नवी मुबईतील मनसे कडून सिबीडी येथे येथे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने अनेक वेळा आश्वासन देवूनही विज बिलात कोणत्याही प्रकारची सूट मात्र अद्याप दिलेली नाही. कोरोना काळात आधीच लोकांच्या नोकऱ्या गेल्या असताना पाठवण्यात आलेली हजारो रूपयांची बिले भरायची कशी असा प्रश्न गोरगरीबांना पडला आहे. त्यामुळे सरकारने त्वरित विज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मनसेने केली आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही औरंगाबादमध्ये मनसेनी आंदोलन केले. औरंगाबाद शहरातील औरंगपुरा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार होता. मात्र तत्पूर्वीच पोलीसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. तरीही मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी कार्यकर्त्यांसह औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकांमध्ये वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन सुरू केले. या आंदोलनात औरंगाबाद शहरातील मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे औरंगपुरा भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढविल्याने छावणीचे स्वरूप आलं होतं. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसानी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
सोलापुरात माकप नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. केंद्राने मंजूर केलेले शेतकरी आणि कामगार कायदा रद्द करण्यात यावा, लॉकडाउन कालावधीत पाठवण्यात आलेले विजेचे बिल रद्द करण्यात यावे यासंह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. सोलापुरातील दत्त नगरपरिसरातील माकप कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला. यावेळी शेकडोंच्या संख्येने विडी कामगार महिला आणि टेक्स्टाईल कामगार यांच्यासह अपंग बांधव देखील मोर्चात सहभागी झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त मोर्चासाठी लावला होता.
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात आज पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात कोल्हापुरातूनही हजारो कर्मचारी सहभागी झालेत. कोल्हापूरच्या टाऊन हॉल येथे एकत्र येत कामगारांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला.. तर गाण्यातून कामगारांना स्फूर्ती देण्यात आली... यावेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली... जो पर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली...
कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात राष्ट्रीय कामगार संघटनांच्या वतीनं आज देशव्यापी आंदोलन सुरू आहे. आज कामगार संघटनानी देशव्यापी संप पुकारला आहे. यात महाराष्ट्रातील विविध कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. नुकतंच लोकसभेच्या पार पडलेल्या अधिवेशनात तीन नवीन कामगार कायदे मंजूर करण्यात आले आहेत आणि व्यवसाय करण्याच्या सुलभतेच्या नावाखाली २७ विद्यमान कायदे रद्द करण्यात आले. हे कायदे पूर्णपणे कॉर्पोरेट जगताच्या हिताचे आहेत. या प्रक्रियेमध्ये ७५ टक्के कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आलं आहे असा आरोप कामगार आणि शेतकरी संघटनांचा आहे. याविरोधात संघटना रस्त्यावर उतरल्यात. आज औरंगाबाद शहरातील क्रांती चौक, सिडको चौक या मोठ्या चौकात मानवी साखळी करून हे आंदोलन करण्यात आले.
वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, सरकारविरोधी घोषणांचे फलक घेऊन मुंबईतील वांद्रे पूर्वमधून मनसेच्या मोर्चाला सुरुवात
विजबिल माफ करावं या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेनं मोर्चा आंदोलन केलंय. कोरोनावर दुर्लक्ष करून हे सरकार भरमसाठ विजबिल जनतेच्या माथी मारत आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी राज्यपाल आणि शरद पवार यांची भेट घेवून विजबिल माफ करण्याची विनंती केली होती. मात्र तरीही सरकारनं याकडे दुर्लक्ष केलंय.. त्यानंतर राज ठाकरेंच्या सूचनेनुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेनं मोर्चा काढला. दरम्यान विजबिल माफ झालं नाही आणि महिला बचत गटांचं कर्ज माफ झालं नाही. तर आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेनं दिलाय.

वीज दरवाढीविरोधात मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश महामोर्चाचं आयोजन केलंय. यासाठी मुंबईच्या विविध भागांतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो कार्यकर्ते वांद्र्याच्या दिशेनं निघण्यास सुरूवात झालीय.
मनसेचे कार्यकर्ते जसे शनिवार वाड्याजवळ पोहचतायत तसे पोलिस त्यांना ताब्यात घेऊन गाडीत घालून पोलिस स्टेशनला नेतायत. मनसेच्या मोर्चाला परवानगी नसल्याने कारवाई होत असल्याचं पोलिसांच म्हणणंय तर पोलिसांनी आज सकाळी परवानगी नाकरल्याच मनसे नेत्यांच म्हणणंय. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आपण पोलिस स्टेशनमधेच आंदोलन सुरू करणार असल्याचं मनसे नेत्यांनी म्हटलयं.
औरंगाबाद मनसे मोर्चाला परवानगी नाही.औरंगाबाद फुले पुतळ्यापासून निघणाऱ्या मोर्चाची नाकारली परवानगी..मनसे मोर्चा काढण्यावर ठाम.पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पुण्यातील मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली. शनिवार वाड्यासमोर जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येतंय
वाढीव वीज बिलाच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून आता जनतेला न्याय देण्यासाठी आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्चामध्ये लाखो लोक सामील होतील असे नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
आज 26 नोव्हेंबर अर्थात संविधान दिनाचा मुहूर्त साधत देशातल्या अनेक कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरोधात देशव्यापी बंदचं आवाहन केलं आहे. देशातल्या कामगार कायद्यात जे बदल होत आहेत ते घातक असल्याचा आरोप करत विविध हक्कांसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : आजचा दिवस हा मोर्चा आणि आंदोलनाचा ठरणार आहे. कारण संविधान दिवस अर्थात 26 नोव्हेंबरचा मुहूर्त साधत आज कामगार संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. याची महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांद्याच कामगार संघटना, बँक कर्मचारी आणि शेती संघटना एकाच मुद्द्यावर एकाच दिवशी एकत्रितपणे आंदोलन करत आहेत. त्यासोबतच राज्यातील वाढीव वीज बिलाविरोधातील मनसेचा मोर्चाही आज आहे. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसेच्या वतीने एकाच वेळी मोर्चा काढण्यात येणार आहे.


 


वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचे राज्यभरात मोर्चे
वाढीव वीज बिलाच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून आता जनतेला न्याय देण्यासाठी आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्चामध्ये लाखो लोक सामील होतील असे नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.


 


पूर्ण राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झालेल्या कालावधीमध्ये विजेचा वापर जास्त झाल्याचे कारण देत महावितरणच्या वतीने राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल पाठवण्यात आली. अव्वाच्या सव्वा वीज बील असल्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. राज्य सरकारने ही वीज बिलं दुरुस्त करुन देण्याची देण्याचं आश्वासनही दिलं होतं. मात्र पुन्हा राज्य सरकारने घूमजाव केल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज (26 नोव्हेंबर) संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर एकाच वेळी वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ आणि शासकीय धोरणांच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केलेला आहे.


 


कामगार संघटनांकडून देशव्यापी बंदची हाक
आज 26 नोव्हेंबर अर्थात संविधान दिनाचा मुहूर्त साधत देशातल्या अनेक कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरोधात देशव्यापी बंदचं आवाहन केलं आहे. देशातल्या कामगार कायद्यात जे बदल होत आहेत ते घातक असल्याचा आरोप करत विविध हक्कांसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.


 


शेती क्षेत्रातले जे तीन महत्त्वाचे कायदे मोदी सरकारने नुकतेच मंजूर केले. त्यामुळे नाराज असलेल्या शेतकरी संघटनाही या बंदला पाठिंबा देणार आहेत. देशातल्या दहा केंद्रीय कामगार संघटना तसेच 35 फेडरेशन यात सहभागी होणार आहेत. जवळपास 25 कोटी कर्मचारी यात सहभागी होतील असा दावा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षात हे पहिल्यांदाच चित्र दिसेल की कामगार संघटना बँक कर्मचारी आणि शेती संघटना एकाच मुद्द्यावर एकाच दिवशी एकत्रितपणे आंदोलन करत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.