नवी दिल्ली : देशातील स्वच्छ रेल्वे स्टेशन्सच्या यादीत महाराष्ट्रातील 36 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानक या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल जाहीर केला.
स्वच्छ रेल्वे स्टेशन्सच्या यादीत जोधपूर रेल्वे स्थानक पहिल्या क्रमांकावर आहे, तर जयपूर आणि तिरुपती दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ए1 श्रेणीमध्ये वांद्रे स्थानकाचा समावेश असून ते टॉप 10 मधील मुंबईतलं एकमेव स्टेशन आहे.
स्वच्छ रेल्वे स्टेशन्सच्या यादीत देशातील 407 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर, दरवर्षी 50 कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवून देणारी 75 रेल्वे स्थानकं ए1 श्रेणीत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दहा स्टेशन्सनी स्थान मिळवलं आहे.
मुंबई-सीएसएमटी स्थानक (13) ने 679.1 गुणांवरुन 893.4 गुणांवर तर दादर स्थानक (49) ने 552.2 गुणांवरुन 913 गुणांवर झेप घेतली आहे. यादीत मुंबईतील आठ उपनगरीय स्थानकांनी नंबर लावला आहे.
वांद्रे, सीएसएमटी आणि दादरशिवाय पुणे, नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), मुंबई सेंट्रल, सोलापूर, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकांचा ए1 श्रेणीत समावेश आहे. कल्याणची 63 व्या क्रमांकावरुन 74 व्या स्थानावर घसरण झाली आहे.
ए श्रेणीमध्ये 332 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातील 26 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. अकोला, नाशिक रोड, दौंड, बल्लारशाह, अमरावती, वर्धा, भुसावळ, शेगाव, कोल्हापूर, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुर्डुवाडी, जालना, जळगाव, पनवेल, लोणावळा, परभणी, कोपरगांव, औरंगाबाद यासारख्या रेल्वे स्थानकांचा समावेश झाला आहे.
देशातील स्वच्छ रेल्वे स्टेशनची यादी, मुंबईत वांद्रे अव्वल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2018 09:13 AM (IST)
स्वच्छ रेल्वे स्टेशन्सच्या यादीत जोधपूर रेल्वे स्थानक पहिल्या क्रमांकावर आहे, तर जयपूर आणि तिरुपती दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -